
सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे निवृत्त पोलीस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. गोव्यात झालेल्या एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ज्युलिओ रिबेरो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपबाबत त्यांची मत व्यक्त केले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ज्युलिओ रिबेरो गोव्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील हिंदू व ख्रिश्चन समुदायाच्या परिस्थितीवर बोलतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर परखड मत व्यक्त केले. पाकिस्तानमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन समुदायाला दुय्यम नागरिक म्हणून वागणूक मिळत आहे. तीच परिस्थिती हिंदुस्थानातही निर्माण होईल की काय? अशी भीती मला वाटतेय, असे विधान रिबेरो यांनी केले. याची चर्चा होत आहे.
नाताळाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत ख्रिश्चन समुदायातील काही मान्यवरांशी संवाद साधला. याबाबत बोलताना रिबेरो यांनी मोदी सरकार केरळमध्ये मोठ्या संख्येनं असणाऱ्या ख्रिश्चन समुदायाला चुचकारण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत मांडले. त्यांच्यातील एक बिशप मोदींच्या या प्रयत्नांसमोर राजी झाले. मला वाटतेय की एक बिशप मोदींच्या भूमिकेशी सहमत झाले म्हटल्यावर इतर बिशपही सहमत होतील. मोदी नेमके काय करू पाहातायत हे पाहावे लागेल, असेही रिबेरो म्हणाले.
मोदी सांगतात त्यातल्या अनेक गोष्टी या फक्त मतांसाठी असतात. मला आशा आहे की ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांनी दिलेला संदेश हा त्यांच्यात घडून आलेल्या हृदयपरिवर्तनामुळे असावा. तसे असेल, तर ती एक चांगली बाब म्हणावी लागेल. पण मला शंका आहे. कारण मूळ हेतू हा हिंदुस्थानचा भगवा पाकिस्तान करणे हा आहे, असे मोठे विधानही रिबेरो यांनी केले.

























































