
दिल्लीहून गोव्याला चाललेल्या विमानात धक्कादायक घटना समोर आली आहे. विमानाच्या शौचालयात एक प्रवाशाने सिगारेट ओढली. याप्रकरणी प्रवाशावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष असे गुन्हा दाखल केलेल्या प्रवाशाचे नाव आहे. अकासा एअरच्या विमानात शनिवारी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा रहिवासी असलेला आशिष शनिवारी अकासा एअरचे विमान QP-1625 ने गोव्याला चालला होता. या प्रवासादरम्यान आशिषने विमनाच्या शौचालयात सिगारेट ओढल्याचा आरोप आहे. त्याच्याकडून एक लाईटर देखील जप्त करण्यात आला आहे, ज्यामुळे विमान आणि विमानातील प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
प्रवाशाविरोधात मोपा विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अकासा एअरने घटनेची पुष्टी केली करत त्यांच्या क्रूने आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. सुरक्षा आणि नियामक प्रक्रिया आणि कायद्यानुसार कर्मचाऱ्यांनी आवश्यक प्रोटोकॉलचे पालन केले आणि गोव्यात आगमन होताच त्या व्यक्तीला संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले, असे एअरलाईनने नमूद केले.


























































