
जगभरात यावर्षी कोरोनाचा प्रभाव असल्याने पालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात वन्यजीव सप्ताह ऑनलाइन साजरा केला जात आहे. यामध्ये 4 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय वन्य जीव दिनानिमित्त ऑनलाइन झू टॉक शो, पशू-पक्ष्यांचे दर्शन, मार्गदर्शन आणि माहिती दिली जाणार आहे. संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी ही माहिती दिली. पालिकेचे ट्विटर हँडल, माय बीएमसी अॅप यावरील लिंकवरून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. दरम्यान, बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही विविध कार्यक्रम पार पडणार आहेत.
रविवार 4 ऑक्टोबरला जगभरात वर्ल्ड अॅनिमल डे अर्थात आंतरराष्ट्रीय वन्यजीव दिवस म्हणून साजरा केला जातो. तर 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान वन्य जीव सप्ताह साजरा करण्यात येतो. बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये वन्य जीव सप्ताह सुरू असून यंदा कोरोनाचे संकट असल्याने आंतरराष्ट्रीय जीव दिवस ऑनलाईन सुरु आहेत. दरम्यान, रविवारी आंतरराष्ट्रीय जीव दिवसाचे निमित्त साधत यावर्षी वन्य जीव सप्ताहात रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील वन अधिकाऱयांना वाईल्ड अॅनिमल ट्रेनिंगचे (रेस्क्यू ऑपरेशन) प्रशिक्षण रविवार 4 ऑक्टोबरला देण्यात येणार आहे. तसेच लोकांमध्ये प्राण्यांप्रती जनजागृती निर्माण करणे, कॅमेरा हाताळणे, प्राण्यांना रेक्यू करताना साहित्य कशा प्रकारे हाताळावे असे विविध कार्यक्रम वन्य जीव सप्ताहानिमित्त बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये राबवण्यात येणार आहेत.
असे आहे ऑनिमल डेचे महत्त्व
इटली येथे 1925 मध्ये प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनात पाच हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. सहा वर्षे सतत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. परंतु युनोने हे प्रदर्शन पाहून 1931 मध्ये 4 ऑक्टोबर हा दिवस वर्ल्ड अॅनिमल डे घोषित केला.


























































