
जेव्हा देश समृद्ध आणि सुरक्षित असतो, तेव्हाच वैयक्तिक समृद्धी प्राप्त होऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. केरळमधील कोची येथे सोमवारी ‘बालगोकुलम’ या संघाशी संबंधित विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक संघटनेच्या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते उपस्थितांना संबोधित करत होते.
समृद्धी आणि सुरक्षा या गोष्टी स्वतंत्रपणे साध्य करता येत नाहीत, असेही भागवत यांनी यावेळी नमूद केले. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.
‘जेव्हा देश समृद्ध आणि सुरक्षित असतो, तेव्हा कुटुंबेही समृद्धी आणि सुरक्षा प्राप्त करतात. जेव्हा व्यक्ती राष्ट्राच्या समृद्धीसाठी आणि सुरक्षिततेसाठी कार्य करतात, तेव्हा त्या स्वतः देखील समृद्ध होतात’, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, लोकांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी वारंवार प्रोत्साहित केले जाते.
तरुणांचा संदर्भ देत भागवत म्हणाले की, तरुणांनी स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करून आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याचा प्रयत्न करावा की देशाच्या विकासासाठी काम करावे, याबाबत अनेकदा संभ्रम असतो. मात्र याबाबत कोणताही संभ्रम नसावा, कारण करिअर घडवणे आणि राष्ट्रासाठी काम करणे या गोष्टी एकमेकींच्या विरोधात नाहीत. योग्य मार्गाची निवड करणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे’, असे ते म्हणाले.
दरम्यान, त्यांनी ‘बालगोकुलम’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांशी संवादही साधला.


























































