
संजय मोने
नटसम्राट याच नावाने त्याला सगळे हाक मारतात. त्यात कुचेष्टेचा भाग जास्त…तसं म्हणायला गेलं तर त्याने कधीच प्रमुख भूमिका किंवा प्रमुख कशाला, महत्त्वाच्या भूमिकाही केल्याचं कुणाला आठवत नाही. पण तो कायम नाटकाशी निगडित आहे, तब्बल वीस-पंचवीस वर्षे तरी तो रंगभूमीच्या ओसरीवर येऊन आपल्या सेवेची कावड रिती करतो आहे.
व्यावसायिक रंगभूमीवर त्याने एखाद् दोन नाटपं केली असतील. त्याच्या अभिनय नैपुण्याचा कस लावून घ्यायला तिथले लोक घाबरतात. राज्यस्तरीय नाटय़स्पर्धा मात्र तो सातत्याने करतो. नाटय़ कशाला, एकांकिकाही करतो. त्याला अभिनय येतो की नाही यावर एखाद्या नाटय़ संमेलनात एक चर्चासत्र नक्की होऊ शकतं.चांगल्यापैकी शिकलेला आहे.उत्तम नोकरी आहे. तिथे, एक कार बाळगण्याएवढा, चांगला पगारही त्याला मिळतो.अधिकारी आहे तो त्याच्या पंपनीत. छत्र्या बनवते त्याची पंपनी, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात तालीम सुरू असेल तर किंवा त्या काळात प्रयोग असेल तर समस्त कलाकार आणि पडद्यामागील तमाम कलाकार यांना फुकट छत्री आणून देतो तो. उत्तम दर्जाची. स्त्र्ााr कलाकारांना नाजूक अशा दुमडल्या जाणाऱ्या छत्र्याही तो आवर्जून देतो. स्वभाव अत्यंत मनमिळावू. खर्चाला हात कायम सैल, दिसायला अगदी देखणा म्हणता येणार नाही, पण नीटस. अवयव सगळे जागच्या जागी आहेत त्याचे. पण त्याच्या चेहऱ्यावर अशी एक काहीतरी भावना कायम वस्तीला असते की ज्यामुळे तो प्रमुख भूमिका पेलून नेऊ शकत नाही. अर्थात त्याला त्याची कल्पनाही नाही. नेहमीच सगळ्या भूमिकांची निवड झाली तरी एक दोन पात्रांची जागा भरून काढायची राहतेच, त्या जागेत तो अत्यंत चपखल बसतो, फिट्ट म्हणावा तसा.जे काही त्याच्या वाटय़ाला संवाद येतात, बहुतेक वेळा ते दोन तीन वाक्य किंवा एखादा उद्गार या पलीकडे नसतात.
खरं तर इतक्या नगण्य भूमिका करणाऱ्या कलाकाराला नटसम्राट का म्हणत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्याचं उत्तर असं की, त्याने आजपर्यंत एकही प्रयोग न चुकता केला नाहीये. पण तो चुकला तरी बरेचदा इतर नट सावरून घेतात किंवा खूप वेळेला तो चुकला आहे हेसुद्धा प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. त्याने दोन तीन नाटकात असा काही घोळ घातला होता की संपूर्ण प्रयोगाची फटफजिती झाली. दर वर्षी कोकणात आपल्या गावी जाऊन तिथल्या स्थानिक नाटकात काम करणे हा त्याचा छंद होता. तिथले लोकही, नटसम्राट बऱ्यापैकी आर्थिक सहाय्य करत असल्याने, त्याला एखादी भूमिका देऊ करत. त्यालाही मोठी भूमिका करायची महत्त्वाकांक्षा कधीच नव्हती.एकदा त्याच्या गावाच्या नाटकांत यम बीम लोक होते. नायक मरतो आणि यम त्याचे प्राण न्यायला येतो. मग त्याची बायको यमाबरोबर वादविवाद करते आणि यम त्याचे प्राण परत करतो, असं काहीतरी नाटक होतं. याच्या डोक्यात काय आलं आणि का आलं देव जाणे! नाटक सुरू झालं आणि याने यमाला सांगितलं की, तू रेडय़ावर बसून प्रवेश कर. आयत्या वेळी रेडा कुठे मिळणार? पण गाव असल्यामुळे तो मिळाला. मग त्याने एक दोर आणला आणि रेडय़ाच्या पोटाखालून वेढा देऊन यमाचे पाय बांधले. पहिला प्रवेश संपला आणि त्याने रेडय़ाला विंगमधून ढकलून मंचावर पाठवले. समोरचा प्रेक्षकवर्ग आणि दिवे बघून तो बुजला आणि उधळला. खाली उडी मारून त्याने प्रेक्षकांत धूम ठोकली. वरचा यम त्याच्याबरोबर फरपटत गेला. त्याचेच प्राण जायची वेळ आली होती. सगळं झाल्यावर नटसम्राट इतपंच म्हणाला, “रेडय़ाची तालीम घेतली असती तर असं झालं नसतं!’’ यम तीन महिने अंथरुणाला खिळून होता.
त्यानंतर नटसम्राटाला गावाचे लोक नाटक झाल्यावर, काल प्रयोग झाला, असा निरोप पाठवत. प्रयोगात एका पात्राला दुसऱ्या पात्राच्या नावानं हाक मारणं, स्टेजवर वेळेच्या आधी किंवा उशिरा प्रवेश करून इतर अभिनेत्यांना अचंबित करणं, धडपडणं, अडखळून पडणं, नाटकात चहा प्यायच्या प्रसंगात कपात असलेले पाणी सांडणं, चालू दृश्यात मिशी गळून पडणं, धोतर आणि त्याचं शरीर एकमेकापासून दुरावणं हे तर कायमच त्याच्या हातून घडत असे. एका प्रयोगात त्याने लढाईच्या प्रसंगात तलवार उपसली आणि पातं म्यानातच राहिलं, त्याच्या हाती फक्त मूठ आली. सगळे अवाप् झाले. आता पुढे? पण नटसम्राट डगमगला नाही. त्याने फक्त मूठ गरागरा फिरवत लढाई चालूच ठेवली आणि नाटकांत त्याच्या हातून जो मरणार होता त्याच्या पोटात ती त्वेषाने खुपसली. प्रेक्षक खदाखदा हसायला लागले. मराठी ऐतिहासिक विनोदी नाटक जगात बहुदा पहिल्यांदाच सादर झालं असावं. ‘आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’ या वाक्याऐवजी तो ‘आंधळं दळतंय आणि पित्र कूट खातंय’ असं म्हणाला आणि नाटकाची वाट लावून गेला होता.पण तरीही त्याची कारकीर्द सुरूच होती. शेवटी एका नाटकात असा काही प्रसंग घडला की नटसम्राटाला निवृत्ती पत्करावी लागली.
स्पर्धेतील नाटक सुरू झालं. तिसरी घंटा वाजवली गेली. पडदा उघडला. रंगमंचावर पोलीस स्टेशनचं दृश्य लागलेलं. सुरुवातीचं वातावरण निर्मिती करणारं संगीत वाजलं. नंतर तिथला टेलिपह्न वाजला आणि इन्स्पेक्टरने प्रवेश केला. वाजणारा पह्न उचलण्याऐवजी तो तिथेच फेऱ्या मारू लागला. पह्न वाजतोय. हा फिरतोय. ध्वनिमुद्रित केलेल्या दहा बारा रिंग्स वाजल्या तरी इन्स्पेक्टर फिरत राहिला. पडदा टाकून नाटक थांबवण्यात आलं. दिग्दर्शक आला आणि त्याने फाडकन नायक असलेल्या इन्स्पेक्टरच्या कानाखाली चौथी घंटा वाजवली.
“पह्न कोण उचलणार? तुझा बाप?’’ खडय़ा आवाजात त्याने नायकाला विचारलं.
नायकाने उलट दिग्दर्शकाच्या कानाखाली पाचवी घंटा वाजवली.
“इथे पह्न ठेवणार कोण? तुझा बाप?’’ नायकाचा आवाज रंगमंच भेदून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. रंगमंचावर उचलून बोलण्यासाठी पह्नच नव्हता.
“पह्न ठेवायची जबाबदारी कोणावर होती?’’ दिग्दर्शक.
“माझी होती..’’ पडलेल्या आवाजात विंगमधून आवाज आला.
“मी ठेवायला विसरलो…’’ नटसम्राट हातात एक पह्न,ज्याची वायर लोंबत होती, ती घेऊन उभा होता. त्यानंतर तिथल्या तिथे नटसम्राटाच्या आई-वडिलांना उद्देशून शिवीगाळ करण्यात आली. त्याला हाताला धरून सगळ्यांनी मिळून हाकलून दिलं.
“चुका होतात ना माणसाच्या हातून! जो चुकतो तोच मानव असं आपल्याच एका नाटकात वाक्य होतं. माझ्याच तोंडी होतं ते.’’
“तेही वाक्य म्हणताना तेव्हा चुकला होतास तू नटसम्राट! जो चुकतो तोच दानव! असं म्हणालास आणि ते वाक्य पुढच्या दृश्यात होतं, जे तू आदल्या दृश्यात म्हणालास.’’ दिग्दर्शक, ट्रेनमध्ये अख्खं पगाराचं पाकीट मारलं गेलं असं कळल्यानंतर माणूस जसा मटकन खाली बसेल, तसा तिथल्याच एका खुर्चीवर कोसळला आणि त्या क्षणी नटसम्राट रंगमंचावरून कायमचा निवृत्त झाला.
(लेखक ज्येष्ठ अभिनेते आहेत.)





























































