निळी शेपटी हिरवी पाठ…

863

विद्या कुलकर्णी, [email protected]

पक्ष्यांचं सुंदर, रंगीबेरंगी जग… इवलासा, चिमुकला जीव… आपल्या छोटय़ाशा अस्तित्वाने संपूर्ण निसर्गात बहुरंगी चैतन्य आणतो… विविध पक्षी जाणून घेऊया ‘स्वच्छंद’ होऊन…

नमस्कार मंडळी. मी विद्या… विद्या कुलकर्णी!

पुढील एक वर्ष ‘फुलोरा’च्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला येतेय!

लहानपणापासूनच मला निसर्ग खुणावत असे, परंतु व्यवसायानिमित्त इंजिनीअरिंगच्या क्षेत्रात गेले व निसर्गाशी दोस्ती मागे पडली. पण म्हणतात ना ‘अगर किसी चीज को दिल से चाहो, तो सारी कायनात आपको उसे मिलाने की कोशिश करती है…’ अगदी तसेच काहीसे माझ्या बाबतीत झाले.
निवृत्तीनंतर ही आवड पुन्हा मनामध्ये डोकावू लागली आणि गेल्या सहा वर्षांपासून मी वन्यजीव छायाचित्रणाला सुरुवात केली. त्यातही ‘पक्षी’ जरा जास्त जवळचे वाटले. अगदी ‘पहिले प्रेम’ म्हणा ना!! आणि निसर्गाच्या या अद्भुत दुनियेत मी हरखून गेले.

या माझ्या छंदामुळे मला हिंदुस्थानात उत्तराखंड ते गोव्यापर्यंत प्रवास करायला मिळाला. आज या मितीस माझ्याकडे अडीचशेपेक्षाही अधिक पक्ष्यांच्या छायाचित्रणाचा संग्रह आणि त्यांची बरीचशी माहितीही जमवलेली आहे, जी मी तुमच्यापर्यंत पोचवण्यास उत्सुक आहे. या माझ्या प्रयासात डॉ. स्नेहलता धायगुडे, शोभा कर्णिक, सीमा जोशी आणि रश्मी पाटील माझ्याबरोबर असणार आहेत.पक्ष्याचे वर्णन ‘जीव अमुचा चिमुकलासा, तरीही पंख पसरुनी झेप घेई आकाशी’ अशा शब्दांत करता येईल.

पक्षी हे उबदार रक्ताचे द्विपाद असतात व कठिण कवचाची अंडी घालतात. अंडी उबवण्याचे काम नर व मादी दोघेही करतात. पक्ष्यांची चोच काटेरी, हाडे पोकळ, पंख आणि पुढील हात पंखांमध्ये रूपांतरित असतात. थोडक्यात त्यांना पंख असलेले द्विपाद म्हणतात.

पक्ष्यांचे रक्त उबदार असल्यामुळे पंखांचा उपयोग त्यांच्या शरीराचे तापमान समतोल राखण्यासाठी होतो. पंख थंडीपासून संरक्षण करत असतात. पक्ष्यांचे आकार लहान फुलटोच्या, हमिंगबर्डपासून शहामृग, सारस क्रेन एवढे मोठे असू शकतात. हिंदुस्थानात सारस क्रेनव्यतिरिक्त हिमालयन दाढीवाला गिधाड किंवा लेमरजीयर असे मोठे पक्षी आहेत आणि लहान आकाराचा हमिंगबर्ड मनुष्याच्या अंगठय़ापेक्षा किंचित मोठा आहे.

बहुतेक पक्षी उड्डाण करण्यास सक्षम असतात, परंतु पेंग्विन, शुतुरमुर्ग आणि किवीसारख्या पक्ष्यांना उडण्याची क्षमता नसते. पक्ष्यांना एक उत्तम, तीक्ष्ण नजर आणि ऐकण्याची शक्ती प्रखर असते, पण माणसासारखी जिभेने चव घेण्याची सोय नसते. काही पक्षी रात्रीचे तर काही दिवसा तर काही संध्याकाळच्या वेळी सक्रिय असतात आणि काही पक्षी रात्री व दिवसा दोन्ही वेळा सक्रिय असतात. जगभरात पक्ष्यांच्या 9000 प्रजाती आहेत, त्यातील 1300 हिंदुस्थानात आहेत आणि जवळजवळ 150 प्रजाती मानवजातीच्या आगमनानंतर लुप्त झाल्या आहेत.

लाँग टेल ब्रॉडबिल

निळी शेपटी पाठ हिरवी, काळी टोपी डोक्यावरती, चित्र पाहूनच प्रसन्न वाटे, समक्ष देशील आनंद किती!

लाँग टेल ब्रॉडबिल हा पक्षी अतिशय सुंदर, देखणा रंगीत असा, एखाद्या लहान मुलांच्या ‘कार्टून’ सारखा दिसतो. या पक्ष्यांचे वास्तव्य हिमालयात, साधारण 10,000 फुटांच्या वरती, पूर्वेला पूर्वोत्तर हिंदुस्थान ते दक्षिणपूर्व आशियापर्यंत आढळते. हा उत्तराखंडाचा राज्य पक्षी आहे.

लाँग टेल ब्रॉडबिलची लांबी सुमारे 25 सें.मी. (10 इंच) असून वजन 50 ते 60 ग्रॅम दरम्यान असते. त्याच्या तीव्र साद / शीळद्वारे (त्सेअय प्सयुव – तत्सम, काहीसे) आपण त्याला ओळखू / शोधू शकतो. लाँग टेल ब्रॉडबिल या पक्ष्याचे साधारण असे वर्णन करता येईल…

शेलाटा, नाजूक व लांब ठेवणीचा असा हा पक्षी, त्याचा वरचा भाग तेजस्वी हिरवा, अंतर्गत निळा-हिरवा रंग, निळी शेपटी, काळे डोके, पिवळा चेहरा, मुकुटावर निळा पॅच, कानाभोवती पिवळा-निळा पॅच, वैविध्यपूर्ण पिसारा, हिरवी-पिवळी चोच व मोठे गोलाकार डोळे, सर्व पक्ष्यांबरोबर मिसळणारा, गोंगाट करणारा, वनामध्ये सामूहिक विहार करणारा, संध्याकाळच्या वेळीसुद्धा सक्रिय असणारा असा हा अतिशय सुंदर पक्षी आहे. (अर्थात पक्ष्याचे अभिजात सौंदर्य अनुभवायला प्रत्यक्ष बघायलाच पाहिजे!!)

हा पक्षी झाडाच्या फांदीवर ताठ बसतो. अंडी घालण्याचा ऋतू सोडल्यास (साधारण मार्च ते ऑगस्ट दरम्यान) हे पक्षी उडत लांबवर प्रवास करतात. उडत असताना पंखाखालील निळ्या-पांढऱया रंगाचे पॅच फार छान चमकतात. एखाद्या वृक्षामध्ये लंबगोल आकाराचे घरटे तयार करतात. मादी साधारणतः 5 ते 6 अंडी घालते, नर-मादी दोघेही अंडी उबवतात व पिल्ले झाल्यावर त्यांना खाऊ घालतात, यावरून त्यांच्यातील वात्सल्याची भावना जाणवते. फळे किंवा बिया खाल्ल्याचा कुठे संदर्भ मिळत नाही, कीटक हेच त्यांचे मुख्य खाणे असावे.

मी हा पक्षी बघण्यासाठी सत्ताल उत्तराखंडामध्ये एप्रिल महिन्यात गेले होते. उंच झाडावर घरटे होते आणि पिल्लांना खाऊ घालण्यासाठी दोन्ही नर मादी सारख्या फेऱया मारत होते. त्यांना बघण्यासाठी बरेच फोटोग्राफर्स वेगवेगळ्या देशांतून, प्रदेशांतून आले होते, पक्षी उडू लागले की, त्यांचे फोटो काढण्यासाठी सर्व फोटोग्राफर्सची धांदल उडायची, ते सर्व दृश्य फारच रमणीय दिसत होते. या पक्ष्यांचे विविध फोटो काढताना वेळ कसा गेला समजलेच नाही!

आपली प्रतिक्रिया द्या