निसर्गाची शाळा, ‘एक मूल, 30 झाडे’ उपक्रम सुरू

मुलांमध्ये निसर्गाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे भविष्य निरोगी व्हावे, यासाठी हिंगोली येथील शिक्षक अण्णा जगताप ‘एक मूल तीस झाडे’ हे अभियान राबवत आहेत. या अभियानात ‘निसर्गाची शाळा’ हा विशेष उपक्रम सुरू आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे शाळा बंद आहेत. मात्र निसर्गाची शाळा ‘ऑनलाईन’ पद्धतीने सुरू आहे. सध्या राज्यभरातील 50 मुले या शाळेत शिकत आहेत आणि आपल्या घरी रोपवाटिका तयार करण्यात व्यस्त आहेत.

निसर्गाच्या शाळेत 14 वर्षांखालील मुले-मुली प्रवेश घेऊ शकतात. दर शनिवारी सायंकाळी 5 वाजता ही शाळा झूम अॅपद्वारे घेतली जाते. इतर दिवशी मुले प्रात्यक्षिक करतात. सध्या पालघर, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, नांदेड, नागपूर, सांगली, परभणी, हिंगोली, वाशीम या जिह्यांतील मुले निसर्गाच्या शाळेत सहभागी झाली आहेत. त्यांच्याकडून रोपवाटिका तयार करून घेतली जात आहे. मुले घरातील जुन्या वस्तू आणि कापडी पिशव्यांमध्ये माती भरून त्यात बिया लावतात, असे अभियान प्रमुख अण्णा जगताप यांनी सांगितले. प्रा. ज्ञानोबा ढगे – नाशिक, रवी देशमुख – परभणी, बालाजी राऊत, प्रेमानंद शिंदे, राजा कदम, विलास जाधव – वसमत, विकास शिंदे, श्याम राऊत, रतन आडे, दत्ता चापके – हिंगोली अशी त्यांची टीम कार्यरत आहे.

रोपवाटिकांना मुलांची नावे

मुले रिकामे डबे, प्लॅस्टिकचे डबे, तेलाच्या पिशव्या-बाटल्या, इतर कापडाच्या पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, काळ्या रोपवाटिकेच्या पिशव्या यात माती भरून देशी फळझाडांच्या बिया लावतात. आंब्याच्या कोय, चिंचेचे चिंचोके, जांभूळ, रामफळ, फणस, सीताफळ, कवठ, बेल, चिकू, जांब अशी फळे लावू शकतात. या उपक्रमात कमीत कमी 30 आणि जास्तीत जास्त कितीही रोपे तयार करू शकतील. अशा प्रकारे मुले घरच्या घरी रोपवाटिका तयार करून निसर्ग संगोपनाचे काम करू शकतात. या रोपवाटिकांना मुलांची नावे दिली जातात, असे अण्णा जगताप यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले.

तन्मय दुधाटे हा परभणीचा देऊळगावचा मुलगा. तन्मय आणि त्याची बहीण तेजस्विनी हिने घरच्या घरी रोपवाटिका तयार केलीय. त्याला तन्मय रोपवाटिका असे नाव दिले आहे. आयुर्वेदिक प्रॉडक्टच्या रिकाम्या बाटल्या, तेलाचे पॅन, डबे यापासून तन्मयने रोपवाटिका तयार केली आहे.
पुण्याच्या आंबेगाव पठारावर राहणारी इयत्ता पाचवीत शिकणारी स्वरा साळुंके निसर्ग शाळेत दाखल झाली आहे.
अवनी जगताप ही मागील तीन वर्षांपासून रोपवाटिका तयार करते. पहिल्या वर्षी 300 रोपे, दुसऱया वर्षी 700 रोपे आणि या वर्षी दोन हजार रोपे तिने तयार केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या