
सामना ऑनलाईन । उरण
मोठमोठे दगड, ब्लॉक, माती टाकून उभारण्यात आलेल्या नौदलाच्या ब्रेकवॉटर जेट्टीमुळे मोरा बंदराभोवती गाळाने विळखा घातला आहे. ओहोटीच्या वेळी पाण्याची पातळी कमी होऊन हा गाळ डोके वर काढत असल्याने मोरा बंदर ते भाऊचा धक्का सागरी प्रवासाला ब्रेक लागत आहे. सागरी वाहतूक सेवा सतत बंद ठेवावी लागत असल्यामुळे अवघ्या 30 मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना दोन ते तीन तास ताटकळत राहावे लागत आहे.
मोरा ते भाऊचा धक्का सागरी प्रवास मुंबईशी जोडणारा अत्यंत जलद मार्ग आहे. स्वातंत्र्यापासूनच या सागरी मार्गावरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. नव्याने सुरू झालेल्या स्पीड बोट सेवेमुळे अवघ्या 30 मिनिटांत तर जुन्या प्रवासी लाँचने 55 ते 60 मिनिटांत मुंबईला पोहोचणे सहज शक्य होत आहे. मात्र आता ही सागरी वाहतूकच समस्यांच्या गोत्यात सापडली आहे. औद्योगिकीकरणामुळे समुद्रात झालेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत चालली आहे. जेएनपीटी आणि त्या अंतर्गत उभारण्यात आलेल्या इतर बंदराच्या उभारणीसाठी मोठय़ा प्रमाणात समुद्रात दगड-मातीचा भराव करण्यात आला आहे. परिणामी जेएनपीटी बंदरापासून थेट मोरा बंदरानजीक असलेल्या नौदलाच्या जेट्टीपर्यंतचा सागरी किनारा प्रचंड गाळाने भरू लागला आहे. त्यामध्ये नौदलाची ब्रेकवॉटर जेट्टी भर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे.
कोटय़वधी खर्चूनही समस्या कायम
मोरा बंदरातील गाळ काढण्यासाठी प्रत्येक दोन-चार वर्षांआड शासनाकडून कोटय़वधी रुपये खर्च केला जातो. मात्र त्यानंतरही मोरा बंदर गाळाने भरण्याचे थांबत नसल्याने समस्या कायम आहे.
किनाऱयापासूनचे सुमारे 150 मीटर लांबीचे अंतर सोडले तर पुढील संपूर्ण ब्रेकवॉटर जेट्टी मोठमोठे दगड, ब्लॉक, माती आदींचा भराव टाकून बनविण्यात आली आहे.
ब्रेकवॉटर जेट्टी पिलरवर नसल्याने समुद्राच्या प्रवाहामुळे आलेला गाळ बंदरात अडकून साचला जातो. तो अगदी मोरा बंदर, बोरी, पाणजे, जेएनपीटी बंदरापर्यंत.
नौदलाची अत्यंत जुनाट झालेली ब्रेकवॉटर जेट्टी नव्याने पिलरवर बांधल्यास मोरा बंदरातील साचणाऱया गाळाची समस्या कायमस्वरूपी दूर होईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
































































