
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करण्यासाठी आता प्रवाशांना रांगा लावाव्या लागणार नाहीत. रागांची कटकट पूर्णपणे संपली आहे. नव्याने सुरू झालेल्या या विमानतळावर डिजीयात्रा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांची सुरक्षा तपसणी आणि बोर्डिंग प्रक्रिया वेगवान होणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या देशव्यापी डिजीयात्रा उपक्रमात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने डिजिटल पद्धतीने अधिकृत सहभाग नोंदवला आहे.
हा उपक्रम सुरू झाल्यामुळे अत्याधुनिक, तंत्रज्ञान आधारित प्रवास प्रक्रियेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. देशातील आणखी पाच विमानतळांवर हा उपक्रम एकाच वेळी सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी दूरस्थ पद्धतीने पार पडला. विमानतळाच्या टर्मिनलमध्ये मोठ्या स्क्रीनवर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी प्रतीकात्मक स्वरूपात तीन प्रवाशांनी डिजीयात्रा ई-गेटचा वापर करत बायोमेट्रिक प्रवेशद्वाराचे रिबन कापले. नवी मुंबई विमानतळावर ही सुविधा सुरू झाल्यामुळे प्रवाशांची रांगेची कटकट पूर्णपणे संपली आहे.
पेपरलेस प्रक्रिया
डिजीयात्रा प्रणालीमध्ये चेहऱ्यावरील ओळख तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. या प्रणालीमुळे विमानतळ प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभहोते. संपूर्ण प्रक्रिया कॉण्टॅक्टलेस व पेपरलेस असल्याने प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी होणार आहे. तसेच डेटा गोपनीयता आणि सायबर सुरक्षेचे आवश्यक मानदंड काटेकोरपणे पाळले जाणार आहेत.
प्रवाशांची संख्या वाढणार
नवी मुंबई विमानतळावरून २५ डिसेंबर २०२५ पासून देशांतर्गत प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. विमानतळाने एक लाख प्रवाशांचा टप्पा पार केला आहे. आता उड्डाणांची संख्या वाढणार असल्याने प्रवाशांची संख्याही वाढणार आहे. येत्या जूनपासून या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरू होणार आहे.



























































