
नालेसफाईच्या नावाखाली ठेकेदारांनी केलेल्या बनवाबनवीचा पंचनामा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केल्यानंतर नवी मुंबई महापालिकेचे प्रशासन सुतासारखे सरळ झाले आहे. अर्धवट सफाई केलेल्या घणसोलीमधील नाल्यांची सफाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शिवसैनिकांनी गेल्या चार दिवसांपासून तुर्भेपासून दिव्यापर्यंतच्या नालेसफाईची पाहणी करून ठेकेदारांचा कारनामा उघडकीस आणला होता.
नवी मुंबईतील नाल्यांची साफसफाई करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १६ मेची डेडलाइन दिली होती. त्यानंतर आयुक्तांसह महापौर सुजाता पाटील यांनी विविध ठिकाणी भेट देऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला आणि या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यानंतर शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नालेसफाईची पोलखोल मोहीम हाती घेतली.
तुर्भे एमआयडीसीतील नाल्यात असलेला प्लास्टिकच्या बाटल्यांचा खच, ऐरोली आणि घणसोलीतील नाल्यांत असलेला शिल्लक गाळ नाल्यात उतरण पंचनामा केला. शिवसेनेकडून सुरू असलेल्या या पंचनाम्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. अर्धवट साफसफाई करण्यात आलेल्या नाल्यांची सफाई पालिका प्रशासनाने पुन्हा सुरू केली.
पोकलेन पुन्हा नाल्यात
शिवसेनेने केलेल्या पोलखोलमुळे नाल्यांची साफसफाई करणाऱ्या ठेकेदारांची पळापळ उडाली आहे. ज्या ठिकाणी मुद्दामहून गाळ आणि कचरा पाठीमागे ठेवण्यात आला होता, तो आता पुन्हा काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. साफसफाईची मलमपट्टी केलेल्या नाल्यात पुन्हा पोकलेन उतरवण्यात आले आहेत. गाळ काढण्याबरोबर नाल्यांमध्ये असलेली झुडपेही आता हटवली जात आहेत.




























































