
राजकीय स्वार्थ डोळ्यांसमोर ठेवून शिवसेनेतून शिंदे गट आणि भाजपमध्ये गेलेल्या गद्दारांचा नवी मुंबईकरांनी महापालिका निवडणुकीत पुरता सुपडा साफ केला. ऐरोलीतील एम. के. मढवी, सानपाड्यातील सोमनाथ वास्कर, कोपरीमधील विलास भोईर यांच्या कुटुंबकबिल्याला घरचा रस्ता दाखवला. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या सुमारे २० माजी नगरसेवकांना मतदारांनी पराभवाची धूळ चारली. त्यामुळे या गद्दारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेकांनी राजकीय समीकरणांची गोळाबेरीज करून शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला. एम. के. मढवी हे आपल्या घरातील तीन नगरसेवकांना घेऊन निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शिंदे गटात गेले. मात्र अचानक केलेल्या या दगाबाजीचा मतदारांनी जोरदार वचपा काढला. २०१५ निवडणुकीत मढवी यांच्या घरातील तीन नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या घरातील तिन्ही उमेदवारांना मतदारांनी घरी बसवले.
कोपरीमधील शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेलेले कोपरी गावातील माजी नगरसेवक विलास भोईर आणि त्यांच्या पत्नी उषा भोईर यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाची धूळ चाखावी लागली. सानपाड्यात सोमनाथ वास्कर यांनी शिवसेनेत असताना हॅट्ट्रिक केली होती. गेल्या वेळेस ते आणि त्यांच्या पत्नी कोमल वास्कर सभागृहात होते. मात्र स्वार्थावर डोळा ठेवून ते शिंदे गटात गेले आणि त्यांचाही मतदारांनी घात केला. वास्कर कुटुंबकबिल्याला या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या गद्दारांशी आणि भाजपच्या दडपशाहीबरोबर दोन हात करून शिवसेनेचे विशाल विचारे, विशाल ससाणे आणि मनसेचे अभिजित देसाई यांनी दणदणीत विजय मिळवला.
- २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेत असताना नगरसेवक असलेले रंगनाथ औटी, सुनिता मांडवे, दमयंती आचरे, दिलीप घोडेकर, नामदेव भगत, काशिनाथ पवार यांनी यावेळी शिंदे गटातून निवडणूक लढवली. या सर्वांना पराभवाचा सामना करावा लागला.
शिवसेनेचा जनाधार वाढला
नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा जनाधार जोरदार वाढल्याचे उघड झाले आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेचे तीन उमेदवार निवडून आले असून सुमारे ११ उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. शिवसेनेचे आदित्य जाधव, राजेंद्र आव्हाड, कविता थोरात, श्रद्धा खानसोळे, समीर बागवान, सुलक्षणा भोईर आणि मनसेच्या रेखा आयवळे यांनी जोरदार लढत दिली.






























































