नवी मुंबईत शिवसेना, मनसेचा प्रचार झंझावात; अमित ठाकरे यांनी घेतल्या उमेदवारांच्या गाठीभेटी

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी बुधवारी ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रात रोड शो केला. विविध ठिकाणी मतदारांच्या प्रचार रॅलीमध्ये ते सहभागी झाले. याप्रसंगी शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, प्रवीण म्हात्रे, मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे आदी उपस्थित होते. शिवसेना आणि मनसेच्या या प्रचार झंझावातामुळे नवी मुंबईतील वातावरण ढवळून निघाले असून प्रस्थापितांच्या पायाखालील वाळू सरकली आहे.

अमित ठाकरे यांचा प्रचार झंझावात बुधवारी सायंकाळी दिघा येथून सुरू झाला. सर्वच विभागातील उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाला भेटी देऊन उमेदवारांबरोबर त्यांनी चर्चा केली. दिघा येथून सुरू झालेल्या या प्रचार झंझावाताची सांगता बेलापूर विधानसभा क्षेत्रात करण्यात आली. रोड शो दरम्यान तरुणांची अमित ठाकरे यांना भेटण्यासाठी एकच झुंबड उडाली. शिवसेना-मनसेच्या या रोड शो आणि प्रचार रॅलीला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.