
फक्त शाळा सुरू असल्याच्या कालावधीत शिक्षण संस्थांना दिलेल्या मैदानांवर शाळाच्या व्यवस्थापनांनी आता बेकायदा कब्जा केला आहे. शाळा सुटल्यानंतर ही मैदाने सायंकाळी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात यावीत अशी अट सिडकोने टाकली आहे. शाळांचे व्यवस्थापन मात्र या मैदानांवर नागरिकांना प्रवेश करण्यास मज्जाव करीत आहे. नागरिकांना बंदी घातलेली मैदाने मात्र लग्न आणि अन्य समारंभांसाठी ताशी दोन हजार रुपये भाड्याने दिले जात आहेत.
नवी मुंबईत बेलापूरपासून दिघ्यापर्यंत सर्वच शाळांना सिडकोने ठराविक कालावधीसाठी मैदाने दिली आहेत. फक्त शाळेत विद्यार्थी असेपर्यंत शाळांनी या मैदानांचा वापर करावा. शाळा सुटल्यानंतर ही मैदाने नागरिकांसाठी खुली करण्यात यावीत अशा सूचना सिडकोने दिल्या आहेत.
शिवसेनेची महापालिकेवर धडक
शहरातील ही मैदाने शाळांच्या बेकायदा कब्जातून सोडवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महापालिकेवर धडक देण्यात आली. शाळांनी गिळंकृत केलेली मैदाने सर्वसामान्य नागरिकांसाठी तातडीने खुली करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील आणि प्रवीण म्हात्रे यांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्याकडे केली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अतुल कुळकर्णी, संतोष घोसाळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.