घटस्थापनेने नवरात्रौत्सावस प्रारंभ, कोल्हापुरात पहाटेपासूनच दर्शनासाठी तुफान गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या करवीरनगरीत प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा जपणाऱया शारदीय नवरात्रोत्सवाच्या चैतन्यदायी व मंगलमय पर्वास आज सकाळी घटस्थापनेने प्रारंभ झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास मानाच्या तोफेच्या सलामीनंतर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, ऐतिहासिक जुना राजवाडा येथील श्री तुळजाभवानी, दख्खनचा राजा श्री जोतिबा तसेच नवदुर्गा मंदिरामध्ये पारंपरिक व विधिवत मंत्रोपचारात घटस्थापना करण्यात आली. शिवाय घरोघरी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना करण्यात आली. दुपारी श्री अंबाबाईची सिंहासनारूढ अलंकारिक पूजा बांधण्यात आली. आज पहाटेपासूनच श्री अंबाबाई मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी केली होती.

घटस्थापना आणि नवरात्रोत्सवानिमित्त आज पहाटेपासूनच सर्वच मंदिरात धार्मिक विधीला सुरुवात झाली. श्री अंबाबाई मंदिरातही धार्मिक विधीला सुरुवात झाली. सकाळी साडेअकरा वाजता देवीला पंचामृत अभिषेक करण्यात आला. दुपारी दोन वाजता आरती, त्यानंतर देवीची पारंपरिक अलंकारिक पूजा बांधण्यात आली. जुना राजवाडा येथील श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे देवीला अभिषेक करून घटस्थापना करून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली.

श्री अंबाबाईची सिंहासनारूढ अलंकारिक पूजा

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई म्हणजे आदिशक्ती. त्यामुळे नवरात्रोत्सवात प्रतिपदेस देवीची सिंहासनारूढ पूजा बांधली जाते. सिंह हे शौर्य, सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्य आणि सत्ता यांचे प्रतीक आहे. सिंहासनावर विराजमान होणारे देव व राजे हे सार्वभौमत्व दर्शवितात. श्री अंबाबाई ही विश्वाची सार्वभौमत्व सत्ताधीश असल्याने ही सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली आहे. आजच्या पूजेत श्रीअंबाबाई राजराजेश्वरी स्वरूपात भक्तांना मनोवांच्छित फल प्रदान करण्यासाठी सिंहासनावर विराजमान असल्याचे दर्शविण्यात आले आहे. श्रीपूजक आनंद मुनीश्वर, किरण मुनीश्वर, मयूर मुनीश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी ही पूजा बांधली.

श्री ज्योतिबा मंदिरात धार्मिक कार्यक्रम

 

दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिरातही नवरात्रोत्सवास धार्मिक उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या माळेला श्री जोतिबाची नागवल्ली पानातील महापूजा बांधून धुपारती सोहळ्याने घट बसविण्यात आले. श्री जोतिबा मंदिरात पहाटे 3 वाजता महाघंटेचा नाद करून दरवाजे उघडले. पहाटे 4 ते 5 या वेळात मूर्तीची पाद्यपूजा, मुखमार्जन, काकड आरती झाली. त्यानंतर पंचामृत महाभिषेक विधी झाला. त्यानंतर श्री जोतिबाची नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापूजा बांधण्यात आली. ही पूजा प्रवीण कापरे, अंकुश दादर्णे, प्रकाश सांगळे, संतोष झुगर, आदिनाथ लादे, महादेव झुगर, बाळासाहेब सांगळे, दगडू भंडारी यांनी बांधली. पूजेसाठीची पाच हजार पाने चिकोडी तालुक्यातील खडकलाट येथील भाविकांनी दिली. सकाळी 9 वाजता घटस्थापनेसाठी श्रीचे पुजारी, उंट, घोडे, देवसेवक, वाजंत्रीसह धुपारती सोहळा निघाला.

मूळपीठ निवासिनी यमाई देवीच्या उत्सवाला प्रारंभ

 

औंध ः महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ग्रामनिवासिनी, मूळपीठ निवासिनी श्री यमाईदेवी तसेच राजवाडय़ातील कराडदेवीच्या नवरात्रोत्सवाला मोठय़ा उत्साहात सुरुवात झाली.

आज सकाळी 12 वाजता राजवाडय़ातील कराडदेवी येथे देवस्थानच्या मुख्य विश्वस्त श्रीमंत गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पूजा करून देवीची मकरात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पुण्यहवाचन, मंत्रपुष्पांजली, महाआरती करण्यात आली. सर्व धार्मिक कार्यक्रमांचे पौराहित्य गणेशशास्त्र्ााr इंगळे यांनी केले. घटस्थापनेपासून दररोज सकाळी व रात्री महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच सायंकाळी गजाननबुवा कुरोलीकर यांचे कीर्तन होणार आहे. उत्सवानिमित्त येथील ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिर व राजवाडा परिसरातील स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच मूळपीठ डोंगरावरील मंदिरावर आणि श्री यमाईदेवी मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे.
– स्वराज्याचा दरवाजा म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यातील वर्धनगड येथील वर्धिनी मातेच्या उत्सवास प्रारंभ झाला आहे.

मोहोटा देवी गडावर उत्साहात घटस्थापना

पाथर्डी : मोहटा देवी गडावर घटस्थापना भक्तिमय वातावरणात व जल्लोषात करून नवरात्रोत्सव महोत्सवाला सुरुवात झाली. देवस्थान समिती अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी व नीता गोसावी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

सकाळी मंदिरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त अश्विनी बिराजदार, ऍड. कल्याण बडे, श्रीराम परताणी, डॉ. श्रीधर देशमुख, ऍड. विक्रम वाडेकर, अनुराधा केदार, शशिकांत दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते.

घटस्थापनेपूर्वी सुवर्णालंकारांनी सजवलेला देवीचा मुखवटा मोहटे गावात दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विश्वस्त बाळासाहेब दहिफळे, अक्षय गोसावी, प्रतिभा दहिफळे यांच्या उपस्थितीत महाआरती झाल्यानंतर देवीचा मुखवटा गावातून वाजत गाजत गडावर आणण्यात आला. प्रथेप्रमाणे देवीच्या मूर्तीवर सोन्याचा मुकुट (तांदळा) चढवण्यात येऊन देवीला साडी नेसविण्यात आली. मूर्तीवर सोन्याचा टोपसह सोन्याचे दागिने देवीला घालण्यात येऊन घटस्थापनेला प्रारंभ झाला. पौरोहित्य भूषण साखरे, भास्कर देशपांडे, नारायण सुलाखे, बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. नवरात्र काळात दररोज कीर्तन, प्रवचन, भजन, जागर, गोंधळ, हरिपाठ, श्री सप्तशती पाठ, दैनंदिन होमहवन असे कार्यक्रम होणार आहेत.

श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात फुलांची आरास

पंढरपूर : नवरात्रोत्सवानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात व सोळखांबी व सभामंडप येथे झेंडू, गुलाब, अस्तर, कण्हेर आदी फुलांची सुंदर आरास करण्यात आली. सुमारे एक टन पाना-फुलांचा वापर करून मनमोहक आरास करण्यात आली आहे. मनमोहक आरास पाहून श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, रुक्मिणी मंदिरात भक्तिमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांच्या वतीने घटस्थापनेनिमित्त फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फुलांची सजावट करण्यात आली आहे.

‘नवरात्र संगीत महोत्सवा’चे आयोजन

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ‘नवरात्र महोत्सवा’निमित्त ‘नवरात्र संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. आज ‘तीर्थ विठ्ठल’ हा भक्तिगीते व अभंगाचा कार्यक्रम झाला. उद्या (मंगळवार) ‘कथ्थक रंग’ कार्यक्रम होणार आहे. संत तुकाराम भवन येथे सायंकाळी 7.30 वाजता कार्यक्रम होणार आहेत.

सोलापूरात ‘आई राजा उदो’चा जयघोष

सोलापूर : शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून भक्तिभावाने प्रारंभ झाला असून, ‘आई राजा उदो-उदो, सदानंदाचा उदो-उदो’च्या गजरात शक्तीदेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ग्रामदेवी रुपाभवानी हिंगुलांबिका देवी, शिवगंगादेवीसह सोलापूरच्या प्रमुख देवीच्या मंदिरात पहाटेपासून धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सार्वजनिक शक्तीदेवी मंडळांनी भव्य मिरवणुका काढत देवीची प्रतिष्ठापना केली. लेझीम झांजपथक व पालखी मिरवणुकीने रस्ते भाविकांनी गजबजून गेले होते. सकाळी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती.

आई जगदंबेचा जागर हा घटस्थापना म्हणजेच शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून भक्तिभावाने प्रारंभ झाला. ग्रामदेवी रुपाभवानी मंदिरात पहाटे नित्योपचार पूजा करण्यात आली, तर दुपारी घटस्थापना करण्यात आली. साखर पेठेतील हिंगुलांबिकादेवी, भवानी पेठेतील शिवगंगा देवी, शुक्रवार पेठेतील कालिकादेवी, चौंडेश्वरी देवी, शेळगी येथील बनशेकरी देवी, दक्षिणकालीमाता, भवानी माता, जुळे सोलापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरात नित्योपचारासह घटस्थापना करण्यात आली. सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. सार्वजनिक मंडळांनी लेझीम, झांजपथक ढोल-ताशांच्या गजरात शक्तीदेवीची भव्य मिरवणूक काढत प्रतिष्ठापना केली. बाळीवेस शक्तीपूजा मंडळ, वारदचाळ नवरात्रोत्सव मंडळासह अनेक मंडळांच्या मिरवणुका आकर्षक होत्या. शहरात जवळपास अडीचशेहून अधिक मंडळांनी शक्तीदेवीची प्रतिष्ठापना केली आहे. तर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मिरवणुकीमुळे प्रमुख भागातील वाहतुकीत बदल करण्यात आला होता. जुळे सोलापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरात पालखी मिरवणूक काढून शक्तीदेवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. तुळजापूरहून शहर व जिह्यातील अनेक मंडळे भवानी ज्योत घेऊन आले आहेत. हिराचंद नेमचंद वाचनालयात नवरात्रातील पहिला रंग केसरी व भगवा मुखपृष्ठ असलेल्या पुस्तकांची माळ लावून अनोख्या पद्धतीने पहिली माळ साजरी केली.

सलग दुसऱया वर्षी मंडळांची धुरा महिलांच्या हाती

कुर्डुवाडी : ः शहरातील संकल्प नवरात्र बहुउद्देशीय महोत्सव मंडळाने सलग दुसऱया वर्षी महिलांच्या हाती धुरा देऊन नवीन आदर्श ठेवला आहे. अध्यक्षा म्हणून सुजाता फासे पाटील, उपाध्यक्षापदी आकांक्षा कऱहाडे व शारदा बागल, खजिनदार म्हणून अंजली येळवे, सहखजिनदार उर्मिला भलाणी, सचिव म्हणून पायल मुळे, सहसचिव मयुरी पापरीकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

मळगंगा मंदिरात अखंड नंदादीप तेवत राहणार

निघोज : ः पारनेर तालुक्यातील निघोज येथील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा मंदिरात मोठय़ा उत्साहात घटस्थापना संपन्न झाली. पोपटकाका देशपांडे यांनी पौरोहित्य केले. यावेळी देवीचे पुजारी ठकाराम गायखे, संतोष गायखे, भोला गायखे, राजू गायखे यांच्यासह महिला भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

देवीच्या गाभाऱयात समईच्या माध्यमातून दहा दिवस चोवीस तास नंदादीप लावण्यासाठी निघोज व परिसरातील प्रत्येक कुटुंबातून एक मोठी समई, वाती व तेल दिले जाते. नंदादीप चोवीस तास सुरू ठेवण्याची जबाबदारी पुजारी गायखे बंधूंची असते. हजारो समयांच्या माध्यमातून हा नंदादीप तेवत असतो. मंदिर गाभारा आणि आतील खोलीत नंदादीप तेवत असतो. मळगंगा देवीच्या दर्शनासाठी दहा दिवसांत लाखो भाविक येतात. मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट, निघोज ग्रुप ग्रामपंचायत व मुंबईकर मंडळ यांच्या वतीने नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी महिलांसाठी दांडिया स्पर्धा तसेच एक दिवस ‘खेळ पैठणी’चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरात असलेल्या मंळगंगा देवीच्या मंदिरातही घटस्थापना करण्यात आली.