
मनी लॉण्डरिंगप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या नवाब मलिक यांच्या हेबियस कॉर्पस याचिकेवर आज न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला असून मंगळवारी यावर खंडपीठ आपला फैसला सुनावणार आहे.
नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ‘ईडी’ने अटक केली असून विशेष न्यायालयाने त्यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र ‘ईडी’द्वारे करण्यात आलेली अटक बेकायदेशीर असून राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे, असा दावा करत नवाब मलिक यांनी अॅड. अमित देसाई व अॅड. फिरोज भरुचा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. तसेच ईसीआयआर रद्द करण्यात यावा व न्यायालयाकडून सुटका करण्यात यावी अशी विनंती मलिक यांनी याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर गेल्या तीन दिवसांपासून सुनावणी घेण्यात आली. आज अखेर यावर सुनावणी पूर्ण झाली. ‘ईडी’च्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह आणि अॅड. हितेन वेणेगावकर यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, सदर याचिका सुनावणीयोग्य नाही. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात वेगळा अर्ज करावा. तर नवाब मलिक यांच्या वतीने खंडपीठासमोर युक्तिवाद करण्यात आला की, सदर कारवाई राजकीय आकसापोटी करण्यात आली आहे.


























































