नवाब मलिक यांची अखेर जामिनावर सुटका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे माजी कबिनेट मंत्री नवाब मलिक यांची अखेर सोमवारी सायंकाळी जामिनावर सुटका झाली. आर्थिक अफरातफर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना वैद्यकीय जामीन दिला. त्यानंतर सोमवारी मुंबई सत्र न्यायालयाने काही अटी-शर्ती आखून देत त्यांना 50 हजार रुपयांच्या बॉण्डवर सोडून देण्याचा आदेश दिला. संबंधित अटींचे पालन करीत मलिक दीड वर्षांनंतर कोठडीबाहेर आले. मलिक यांनी कुठल्याच विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलू नये तसेच ईडीकडे पासपोर्ट जमा करावा, अशा अटी सत्र न्यायालयाने घातल्या आहेत.

अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असलेल्या आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात मलिक यांना अटक केली होती. ते सध्या किडनी विकार व इतर व्याधींनी त्रस्त असल्याने विशेष वैद्यकीय काळजी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला.