गल्लीच्या स्पर्धा जिंकल्यावर लोक वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न बघतात! नवाब मलिक यांचा नारायण राणे यांना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही लोक गल्लीच्या स्पर्धा जिंकल्यावर वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न बघत आहेत. पैशाची ताकद, गुंडगिरीच्या जोरावर लहान निवडणुका जिंकता येतील. इतके मोठे नेते आहेत तर त्यांनी उत्तर प्रदेशमधील 2-4 जागांची जबाबदारी घेऊन जनतेतून निवडून आणण्याची जबाबदारी घेतली तर त्यांना देशाचे मंत्री म्हणता येईल, असे आव्हान राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मंत्री नारायण राणे यांना दिले.

नारायण राणे यांनी जिल्हा बँकेसाठी मोठी लोकं आली तरीही मी त्यांना पुरून उरलो, त्यांचा पराभव करून दाखवला असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उद्देशून केले. यावर नवाब मलिक यांनी गल्लीच्या स्पर्धा जिंकल्यावर काही लोक वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्नं बघत आहेत. गल्लीच्या राजकारणात दादागिरी करून यश मिळाले म्हणून राज्य आणि देशाच्या निवडणुकांचे निकाल आम्ही बदलू शकतो हे त्यांचे बोलणे जास्त होतेय, असा टोला लगावला.

अखिलेश यादव यांची शरद पवारांशी फोनवरून चर्चा

अखिलेश यादव यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या 3-4 तारखा मागितल्या आहेत. शरद पवार नक्कीच उत्तर प्रदेशमध्ये जातील. मलाही उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादीच्या जागांवर जाण्यासाठी सांगण्यात आले आहे. अखिलेश यादव यांनादेखील नक्कीच भेटू. आम्ही आघाडी करून निवडणूक लढत आहोत. तर पक्षाच्या उमेदवारांसोबतच सामूहिक प्रचारात जिथे गरज असेल तिथे आम्ही जाऊ.