नवाझुद्दीन सिद्दीकीचा युटर्न, ओटीटीवर काम करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सेक्रेड गेम’ सारख्या सुपर डुपर हिट ठरलेल्या वेब सिरीजमध्ये झळकलेला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने ओटीटीवर काम न करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. मात्र आता नवाजने युटर्न घेत त्याने त्याला तसे म्हणायचे नव्हते. त्याच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून तो ओटीटीवर काम करतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्याने ओटीटीमध्ये काम करत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

‘मी सध्या ओटीटीवरील अनेक चित्रपटात काम करत आहे. मी इथे बसलोय ते देखील नेटफ्लिक्समुळे. ओटीटी प्लॅटफॉर्मने मला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. त्या प्लॅटफॉर्मवरून आम्ही आमची कला संपूर्ण जगाला दाखवू शकतो. मी मागे जे वक्तव्य केलं त्यात मी काही खास प्रोडक्शन हाऊस बद्दल बोललो जे काहीही बनवत असतात. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी कधीच म्हटले नाही की मी ओटीटी सोडेन. फक्त मला एखाद्या मालिकेप्रमाणे दिसेल असे काहीही करायचे नाही’, असे नवाझुद्दीनने या मुलाखतीत सांगितले.

नवाझुद्दीनचे जुने वक्तव्य

सध्या ओटीटीवरील शो एकतर पाहण्याच्या लायकीचे नाहीत किंवा कशाचे तरी सिक्वेल आहेत. मी ‘सेक्रेड गेम’साठी ‘नेटफ्लिक्स’सोबत काम करायला सुरुवात केली तेव्हा डिजिटल मीडियाविषयी खूप उत्सुकता होती. नवीन लोकांना संधी दिली जात होती. आता त्यातील ताजेपणा निघून गेला आहे. मला ओटीटीवरील शो पाहणेही शक्य होत नसेल तर त्यात मी काम कसे करू, असा सवाल त्याने उपस्थित केला होता

ओटीटी ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलंय!

बडय़ा प्रॉडक्शनसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म धंदा बनला आहे. अनेक अनावश्यक शोसाठी ओटीटी ‘डम्पिंग ग्राऊंड’ बनलंय.  बडय़ा निर्मात्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मोठय़ा लोकांशी फायद्याचे करार केले आहेत. निर्मात्यांना अमर्यादित कंटेंट तयार करण्यासाठी मोठी रक्कम मिळते, मात्र अमर्यादित कंटेंटने गुणवत्तेला मारले आहे, अशी खंत त्याने व्यक्त केली होती.