जहाल माओवादी विलास कोल्हाचे आत्मसमर्पण

652

गडचिरोलीत जहाल माओवादी विलास उर्फ दसरु कोल्हाने गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीला हादरा बसला आहे. विलास कोल्हा नक्षलवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय समितीचा कमांडर इन चीफ आहे. जिल्ह्यातील सर्व हिंसक घटनांचे नेतृत्व विलास कोल्हाने केले आहे. विलासवर एकूण 147 गुन्हे दाखल असून त्यात हत्येचे 30 गुन्हे तर पोलीसांवर हल्ले करणाऱ्या चकमकीचे 40 गुन्हे दाखल आहेत. दोन राज्यात मिळून त्याच्यावर वीस लाखांचे बक्षीस आहे.

मागील वीस वर्षांपासून तो नक्षल चळवळीत आहे. तो मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली परिसरातील रहिवासी आहे. विलास कोल्हा मरकेगाव आणि हत्तीगोटा या दोन मोठया भुसुरुंग स्फोटाच्या घटनेत सहभागी होता. त्या दोन्ही घटनेत 29 जवान शहीद झाले होते. अन्य एका घटनेत सात जवान शहीद झाले त्यातही विलास कोल्हा याचा सहभाग होता. 1 मे 2019 रोजी कुरखेडा तालुक्यात झालेल्या जांभूळखेडा स्फोटात 16 पोलीस जवान शहीद झाले होते. पोलिसांना याठिकाणी येण्यासाठी जाळपोळीची घटना दादापुर येथे घडवली गेली, त्या वाहनांची जाळपोळ विलास कोल्हाच्या नेतृत्वात झाली होती. जिल्ह्याच्या नक्षल चळवळीच्या इतिहासात एके 47 रायफल आणि 35 राउंडसह त्याने केलेले आत्मसमर्पण नक्षल चळवळीतील नैराश्य दिसत आहे. राज्य सरकारने कोल्हावर साडेआठ लाखांचे बक्षिस ठेवले होते. गेल्या वर्षभरात गडचिरोली पोलिसांनी नक्षली कारवायांवर मोठा अंकुश आणत अबुजमाडसह नक्षली तळ असलेल्या विविध भागात कारवाई केली आहे. या दबावामुळेच वर्षभरात नक्षल्यांचे चार डिव्हिजनल कमिटी सदस्य, दोन कमांडर ,दोन उपकमांडर यासह 26 सक्रिय नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या