देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला फार महत्त्व द्यायला नको – अजित पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले. त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर नियुक्ती केली. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत ”राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे, याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही निव्वळ धूळफेक आहे’ असे म्हटले होते. त्याला आता अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. ‘फडणवीसांच्या बोलण्याला फार महत्वं दिलं पाहिजे, असं वाटत नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बदलांबाबत बातमी देताना प्रसारमाध्यमांनी त्याला शरद पवार यांनी भाकरी फिरवली असे म्हटले होते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही निव्वळ धुळफेक असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले, ”राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्षांची निवड करणे याला भाकरी फिरवणे म्हणतात, असं मला वाटत नाही. ही तर निव्वळ धूळफेक आहे. राष्ट्रवादीतील फेरबदल किंवा अजित पवार नाराज असणे, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. मात्र, याला भाकरी फिरवणे म्हणत नाही. तर ही धुळफेक आहे. तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे”

देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याला अजित पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. ”शरद पवार भाकरी फिरवण्याबद्दल काही बोलले आहेत का? ते वाक्य माध्यमांनी चालवलं. देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत. त्यांनी काय म्हणावं, हा त्यांचा अधिकार आहे. पण, त्यांच्या पक्षाने काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. तसा राष्ट्रवादीने काय करावं, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे टीका-टिप्पणी करणं त्यांचं काम आहे. फडणवीसांच्या बोलण्याला फार महत्वं दिलं पाहिजे, असं वाटत नाही,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.