
राज्यात जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचे वाटप झाल्यानंतर विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आल्याने त्यांना हे कसे झेपणार, असा सवाल करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर जिल्हे कसे मॅनेज करायचे त्याचा गुरुमंत्र मी अजित पवारांना नक्कीच देईन, असा टोला फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला होता. आता अजित पवार यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आल्यानंतर अजित पवारांनी त्यावर टीका केली होती. इथे आम्हाला एकाच जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळताना नाकीनऊ यायचे. हे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद सांभाळणार आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी गुरुमंत्र देण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं. जिल्हे कसे मॅनेज करायचे त्याचा गुरुमंत्र मी अजित पवारांना नक्कीच देईन, असे फडणवीस म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीसांच्या टोल्यावर अजित पवारांनी प्रतिटोला लगावला आहे. मी आता त्यांना पत्र पाठविणार आहे की, ट्रेनिंगसाठी केव्हा येऊ? त्या ट्रेनिंगकरता काही फी लागणार आहे का? की ते मोफत दिलं जाणार आहे? त्याबाबत मी त्यांच्याशी हितगुज करतो. त्यांच्याकडून ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो, अशी मिश्किल प्रतिटोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.
राज्य मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्तारावरूनही अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. शिंदे गटातील आमदार नाराज असल्याच्या चर्चेवर ते म्हणाले, कोणाला खुश करायचं आणि कोणाला नाराज ठेवायचं हा त्यांचा अधिकार असून त्यामध्ये आम्ही नाक खुपसण्याचं काम नाही. त्यांच ते ठरवतील. काही महिने तर दोघे जणच सर्व पाहात होते.आता कुठे 20 जण झाले. सांगून सांगून आत्ता कुठे त्यांनी पालकमंत्री नेमले आहेत.त्यामुळे त्यांना ज्यावेळी योग्य वाटेल,तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करतील.हे सर्व जनता पाहत आहे, असे अजित पवार म्हणाले.
























































