सत्तास्थापने संदर्भात शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

ncp president sharad-pawar

राज्याच्या परिस्थितीबद्दल बोलण्यासारखं काही नाही. शिवसेना-भाजप महायुतीला जनतेने कौल दिलेला आहे, त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं. सत्तास्थापनेत आमची काहीच भूमिका नाही. आम्हाला विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची सुसंधी दिली आहे, ती आम्ही पार पाडू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी घटनात्मक पेच निर्माण होऊ नये, म्हणून महायुतीने सरकार स्थापन करावे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रपती राजवटी संदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले की, महायुतीला सरकारने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनी सरकार स्थापन करावं, हाच पर्याय आहे. भाजप नेत्याने असं विधान का केलं? त्याच्या पाठीमागचा हेतू काय? ते माहीत नसल्याचंही ते यावेळी म्हणाले.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सोबत झालेल्या भेटीबद्दल ते म्हणाले की, ‘ते नेहमी भेटतात तसे भेटले. आमच्यात नेहमी सकारात्मक भेट होते’. दिल्लीत हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्यासंदर्भात चर्चा झाल्याचा उल्लेखही त्यांनी वेळी केला.

दिल्लीत सध्या वकील आणि पोलीस यंत्रणेत जो वाद सुरू आहे त्याववर देखील त्यांनी चिंता व्यक्त केली. ‘केंद्र सरकारला आपली जबाबदारी टाळता येणार नाही, कारण दिल्लीतील पोलीस विभागाची जबाबदारी केंद्राकडे. या घटनेकडे गंभीरतेने पहावे. राजधानीत हे सारं होत आहे, हे आपल्या देशाच्या दृष्टीने योग्य नाही, असेही ते म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवर देखील त्यांनी सरकार आणि प्रशासनाला लवकरात लवकर पावलं उचलण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांची स्थिती गंभीर असून नवीन कर्ज पुरवठा करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पिक विमा कंपन्या जबाबदारी पार पाडताना दिसत नाही. अशा कंपन्याच्या प्रतिनिधींना बोलवून पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात केंद्र सरकारने एक बैठक घ्यावी, असेही ते म्हणाले.

अयोध्या निकालावर पवारांचे मत…

अयोध्या संबंधित निर्णय हा पुढे ढकलला आहे. पण जो निकाल येईल तो आपल्या विरोधात निकाल आहे ही भावना कोणत्याही समाजाने करून घेऊ नये. कोणीही कायदा हातात घेऊ नये. बाबरी पाडली तेव्हा जशी स्थिती झाली होती तशी स्थिती पुन्हा येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

…तर आम्ही वाटचं पाहिली नसती

आम्हाला जनतेने कौल दिला असता तर आम्ही वाटच बघितली नसती. सरकार स्थापन केले असते. पण आम्हाला विरोधीपक्षात बसण्याची सुसंधी जनतेने दिली आहे. ते काम आम्ही पार पाडणार, असे शरद पवार म्हणाले. तसेच आपण मुख्यमंत्री बनणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या