राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार प्रथमच एकाच मंचावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट (NCP crisis) पडली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गट पडले आहेत. अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकल्याने निर्णयाचा चेंडू सध्या निवडणूक आयोगाच्या पुढ्यात आहे. दोन्ही गटाकडून याबाबत दावे-प्रतिदावे केले जात असतानाच पक्षफुटीनंतर आज पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकाच व्यासपीठावर येणार आहे.

दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेने उभारलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या नव्या वास्तूचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित राहणार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाकडे आणि भाषणाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार पुण्यातील एका कार्यक्रमात पहिल्यांदाच एकाच मंचावर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिकळ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा हे दोन्ही नेते आमनेसामने आले होते. मात्र त्यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेणे टाळले होते. त्यामुळे आज हे दोन्ही नेते समोरासमोर आल्यानंतर काय घडते आणि दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.