सरकारमधील असंवेदनशील मंत्र्याचे निर्लज्जपणाचे वक्तव्य; जितेंद्र आव्हाड यांचे अब्दुल सत्तारांवर टिकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील काही भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यांसह कोसळलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे शेतमालाला कवडीमोल किंमत मिळत असताना अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील विधान केलं आहे. त्यामुळे सर्व स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.

शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानावर विविध राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, लोकांचा जीव जाणं, याच्या वेदना आणि दु:ख त्यांच्या घरातील लोकांनाच कळतात. एखादा कर्ता पुरुष किंवा एखादा भाऊ जेव्हा आत्महत्या करतो, तेव्हा ते संपूर्ण घर उद्धवस्त होते. पण संवेदनाहीन सरकारमधील एक मंत्री बेशरमपणाने सांगतो की, शेतकरी आत्महत्या तर नेहमीच होतात, यात मोठं काय आहे? लाज, लज्जा, शरम काहीच नसलेली माणसं या मृतांची टिंगलटवाळी करतात, हे दररोजच घडतंय. ते त्यांचा असंवेदनशीलपणा जनतेसमोर आणत आहेत. जनता हे सगळं बघत आहे. सत्तेची मग्रुरी आणि सत्तेचा माज चांगला नाही, हे येथील जनता दाखवून देईन, असेही आव्हाड म्हणाले.

मागील काही दिवसांत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याबाबत सत्तार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी असंवेदनशील उत्तर दिले आहे. शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे विधान अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.