ओबीसी आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचा भाजपचा डाव

राज्यातील शेतकरी, महागाई, बेरोजगार व गोरगरीबांच्या हलाखीच्या परिस्थितीवर भाजपकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देण्याच्या आश्वासनातील भोंगळपणा जनतेच्या लक्षात आला आहे. दुसरीकडे मराठा व ओबीसी समाजात गावोगावी भांडणे लावण्यात येत आहेत. हिंदू-मुस्लिम दंगली होत नाहीत म्हणून जातीय द्वेषाचा नवा फॉर्म्युला तयार केल्याचा आरोप लोकसंग्रामचे अध्यक्ष व माजी आमदार अनिल गोटे यांनी जाहीर पत्रकाद्वारे केला आहे.

ओबीसी व मराठा आरक्षणाचा प्रश्न तीन महिन्यांत निकाली काढू असे सांगितले होते. सरकार येऊन पंधरा ते सोळा महिने झाले तरीही मराठा आंदोलनाच्या नेत्यांसमोर सत्ताधारी पक्षाचे नेते केविलवाणे चेहरे करून भिकाऱ्यासारखे उभे राहतात आणि साहेब, आम्हाला अजून दोन महिन्यांची मुदत द्या असे बेशरमपणे सांगतात, अशा शब्दांत अनिल गोटे यांनी सरकारवर या पत्रकाच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे. जरांगे पाटील यांनी मागील उपोषण सोडताना मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून चाळीस दिवसांची मुदत दिली, पण चाळीस दिवसांतही सरकार काही करू शकले नाही. चाळीस दिवसांत काय केले याचा खुलासाही सरकार करू शकले नाही. केवळ याचना करणे आणि आजचे मरण उद्यावर ढकलणे एवढेच सुरू असल्याचे  म्हटले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप तसेच आरक्षणद्वेष्टे त्यांचे सहकारी यांना महाराष्ट्रातील जनतेने आंतरबाह्य ओळखले आहे. यासाठीच जातीय भांडणे लावून  सामाजिक असंतोष निर्माण करून एकमेकांची घरे पेटवणे एवढा एकच कार्यक्रम भाजपच्या प्राधान्य क्रमांकावर आहे, असे अनिल गोटे यांनी पत्रकात नमूद केले आहे.