
महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांसाठी पहिलं आणि महत्वाचं पाऊल उचललं आहे. शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. कोणत्याही जाचक अटीशिवाय थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार धनंजय मुंडे यांनी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे स्वागत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे.
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही अटींशिवाय,कोणत्याही रांगेत उभं न करता, कोणतेही ऑनलाईन किंवा कसलेही अर्ज न भरायला लावता ‘महात्मा फुले योजनेअंतर्गत’ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा शनिवारी महाविकास आघाडी सरकारने केली. हा अत्यंत स्वागतार्ह व कौतुकास्पद निर्णय असून शेतकऱ्यांना दिलासा देणारे आपलं सरकार आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना कोणतीही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज – विनंती करण्याची गरज भासणार नाही. मार्च 2020 पर्यंत या योजनेअंतर्गत कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम प्रत्यक्ष जमा करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारचं हे पहिलं महत्वाचं पाऊल असून निश्चितच ‘ईडा – पीडा टळून बळीचं राज्य आलं’ असं म्हणणं सार्थ ठरेल, असे धनंजय मुंडे म्हणाले.




























































