
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धनमधील आमदार अवधूत तटकरे यांनी सोमवारी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. माजी आमदार अनिल तटकरे यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन मनगटावर शिवबंधन बांधले. त्यामुळे रायगड जिह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले आहे.
श्रीवर्धन मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अवधूत तटकरे जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. pic.twitter.com/6xAJz2HN0c
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) September 9, 2019
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अवधूत तटकरे, त्यांचे वडील व माजी आमदार अनिल तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी अवधूत तटकरे व अनिल तटकरे यांच्या मनगटावर शिवबंधन बांधले. त्यांच्या सोबत रेवती अवधूत तटकरे व अवधूत तटकरे यांची मातोश्री शुभदा तटकरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. रायगड जिह्यातील तसेच श्रीवर्धनमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
त्यापूर्वी अवधूत तटकरे यांच्या शिवसेनाप्रवेशाची घोषणा करताना शिवसेना आमदार भरत गोगावले म्हणाले की, श्रीवर्धन मतदारसंघातील आमदार अवधूत तटकरे व माजी आमदार अनिल तटकरे आणि तटकरे परिवार असे सर्वजण शिवसेनेत प्रवेश करीत शिवबंधन बांधत आहेत. आम्ही मनापासून त्यांचे स्वागत करीत आहोत. शिवसेनेत इनकमिंग असेच सुरू राहणार आहे.
कोणावरही नाराज नाही
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना अवधूत तटकरे म्हणाले की, मी कोणावरही नाराज नाही. मी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश घेण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझी समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आपण मागील आठवड्यात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे मला आता मागे येता येणार नाही असे अजित पवार यांना मी सांगितल्याचे अवधूत तटकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. रायगड जिह्याच्या विकासासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडेन, असेही ते म्हणाले.
भास्कर जाधवही शिवसेनेत प्रवेश करणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गुहागरमधील आमदार भास्कर जाधव हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. येत्या 13 सप्टेंबरला आपण मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहोत अशी घोषणा खुद्द भास्कर जाधव यांनी गुहागरमध्ये केली. आपल्यासोबत गुहागर मतदारसंघातील पंचायत सदस्य व 73 सरपंचही शिवसेनेत प्रवेश करतील, असेही त्यांनी सांगितले.

























































