राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार प्रकाश सोळंके यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आमदार प्रकाश सोळंके नाराज असल्याने ते राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असल्याचे वृत्त होते. अखेर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे बैठक झाली. या बैठकीमध्ये सोळंके यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले असून त्यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदारकीची ही चौथी टर्म असल्याने पक्षाने मंत्रिपदासाठी संधी द्यावी, अशी मागणी होती. पण मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली. शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा झाल्यानंतर माझे समाधान झाले असून राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सोळंके यांनी दिली आहे.

वर्षाचा शेवट गोड – अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे व आज प्रकाश सोळंके यांच्याशी झालेली चर्चा ही घरातील चर्चा आहे. शरद हे कुटुंबप्रमुख म्हणून सर्वांची काळजी करतात.वडिलकीच्या नात्याने सोळंकेंना पवारांनी समजावले व त्यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यंत्री अजित पवार यांनी दिली. आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. आमदार प्रकाश सोळंके यांच्या राजीनामा न देण्याच्या निर्णयामुळे वर्षाचा शेवट गोड झाला आणि येणारे वर्ष सकारात्मकतेने सुरू होत आहे, असेही ते पुढे म्हणाले.

प्रत्येकाला सन्मान देणे, संधी देणे पक्षाची भूमिका – पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसे ज्येष्ठ नेते आमदार प्रकाश सोळंके यांच्या नाराजीची बातमी काल समोर आली होती. सोळंके आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार अशी चर्चा रंगू लागली. मात्र सोळंके यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून राजीनाम्याच्या चर्चेवर आता पडदा पडला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणे, त्याप्रमाणे प्रत्येकाला योग्य संधी देणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आज आमदार प्रकाश सोळंके यांच्याशी पक्षश्रेष्ठींनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेद्वारे त्यांचे पूर्ण समाधान करण्यात आले.