पाच वर्षे आंदोलनात सातत्य ठेवा, खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

857

पाच वर्षे आंदोलनात सातत्य ठेवा असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला. पोलीस आयुक्तालयात पत्रकारांनी बोलताना त्यांनी भाजपकडून राज्यभरात करण्यात येत असलेल्या आंदोलनाची खिल्ली उडविली.

भाजपासह विरोधी पक्षाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांना आमच्या शुभेच्छा असून विरोधी पक्षाची जबाबदारी ते योग्यरितीने पार पाडत आहेत. विरोधी पक्षांनी सातत्याने आंदोलन करीत राहिले पाहिजे. राज्यातील सरकार चांगले काम करीत असून, विरोधी पक्षानेही महत्वाची भूमिका बजावली पाहिजे असे मत सुळे यांनी व्यक्त केले. हिंगणघाट येथील जळीतकांड प्रकरणी सरकार गंभीर असून दिशा समितीसह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
दिल्लीत नागरिकत्व कायदा दुरुरस्तीच्या विरोधात हिंसाचार सुरु असून ही घटना धक्कादायक आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिंसाचारामुळे केंद्र सरकारची निष्क्रियता सिद्ध झाली आहे. याप्रकरणाची चौकशी करुन सरकारने स्पष्टीकरण दिले पाहिजे. दिल्लीतील दंगल होतेच कशी असा प्रश्न उपस्थित करुन सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आपली प्रतिक्रिया द्या