
‘सिल्व्हर ओक’ हल्लाप्रकरणी एसटी कामगारांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता या प्रकरणात आणखी आठ जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सद्चिदांनद पुरी, राम कातकडे, संकेत नेहरकर, रमेश गोरे या चार जणांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज गिरगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यासोबतच अविनाश पाटील, मोहमद शेख, सविता पवार, कृष्णांत कोरे यांचीही पोलीस कोठडी सरकारी वकिलांनी मागितली होते. त्यानंतर या आठही जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
दरम्यान या सर्वांसह ऍड. सदावर्ते यांनाही उद्या कोर्टात हजर करण्यात येईल. यावेळी फलटण मधील एका प्रकरणात सातारा पोलीस त्याचा ताबा मागण्याची शक्यता आहे.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील पाच महिन्यांपासून आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी शे-दीडशे एसटी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजीसह दुपारी जोरदार निदर्शने केली होती. अचानक हा जमाव घुसल्याने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. या प्रकरणी एसटी कामगारांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.



























































