येत्या निवडणूकीत जनता तुमचा कचरा साफ करेल, राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपवर टीका

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमधील काळाराम मंदिरात आले होते. तिथे त्यांनी हातात झाडू घेत स्वच्छता मोहिम राबवली. भाजपच्या आयटी टीमने त्यांच्या या स्वच्छता मोहिमेचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल केले. मोदींच्या त्या मोहिमेनंतर अनेक भाजप नेत्यांचे कचरा काढतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरातमधील भाजपच्या एका नेत्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो भाजप नेता स्वत:च्या हाताने कचरा जमिनीवर टाकत असून नंतर त्याच ठिकाणी कचरा काढताना दिसत आहे. त्या नेत्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करत भाजपवर टीका केली आहे. ‘’सब गंदा है पर धंधा है यह. स्वत:च्या घरी तरी कधी कचरा काढला होतात का राव ? इकडे वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी साहेब कचरा काढतायत, काय वेळ आलीये यांच्यावर! अरे, जनता मूर्ख नाही रे. प्रत्येक वेळेला तुम्ही फोटो काढणार आणि मिडियाला आणणार. येत्या निवडणुकीत जनता तुमचा कचरा साफ करेल हे लक्षात ठेवा’’, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.