
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया संघात एडलेडच्या ओव्हल मैदानावर दुसरा वन डे सामना सुरू आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने आजची लढत जिंकून मालिका बरोबरीत करण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे. या लढती ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा हिंदुस्थानकडून सलामीला आहे. मात्र हिंदुस्थानला लागोपाठ दोन धक्के बसले. आधी शुभमन गिल 9 धावा काढून बाद झाला, तर विराट कोहलीही आल्या पावली माघारी परतला. विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला.
ओव्हलवर हिंदुस्थानने सावध सुरुवात केली. पहिल्या 6 षटकांमध्ये गिल-रोहितने फक्त 17 धावा केल्या. यानंतर सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात गिल झेवियर बार्टलेटच्या गोलंदाजीवर मिचेल मार्शकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला.
विराटचे हे आवडते मैदान असल्याने यावर तो मोठी खेळी करणार अशी आशा चाहत्यांना होती. मात्र झेवियर बार्टलेटने यावर पाणी फिरवले आणि विराटला शून्यावर पायचीत पकडले. बाद झाल्यानंतर पवेलीयनकडे जात असताना विराटला एडलेडवर उपस्थित प्रेक्षकांनी स्टँडिंग ओवेशन दिले. विराटची ऑस्ट्रेलियातील ही शेवटची सीरिज असून यानंतर हिंदुस्थानचा संघ 2027 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. तो पर्यंत विराट खेळणार की निवृत्ती घेणार हे प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहेत.
2ND ODI. WICKET! 6.5: Virat Kohli 0(4) lbw Xavier Bartlett, India 17/2 https://t.co/aB0YqSCClq #TeamIndia #AUSvIND #2ndODI
— BCCI (@BCCI) October 23, 2025
दुसऱ्या वन डे साठी अंतिम 11 खेळाडू
हिंदुस्थान – रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड