
सामना ऑनलाईन । थिरुवनंतपुरम
केरळमध्ये मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. महापुरामध्ये हजारो लोक अडकून पडले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकांनी (एनडीआरएफ) आतापर्यंत सुमारे दहा हजारांवर लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले आहे. देशातील आजवरचे हे सर्वात मोठे मदतकार्य आहे.
गेल्या 8 ऑगस्टपासून केरळमध्ये पावसाने 324 नागरिकांचा बळी घेतला आहे. एनडीआरएफची 58 पथके राज्याच्या विविध भागांमध्ये मदतकार्यामध्ये गुंतली आहेत. रात्रंदिवस हे मदतकार्य सुरू आहे. त्रिसूर जिह्यात 15, पथनामथिट्टामध्ये 13, अलाप्पुझामध्ये 11, एर्नाकुलम 5, इडुक्की 4, मल्लापुरम 3 तर वायनाड आणि कोझिकोडे जिह्यात एनडीआरएफची प्रत्येकी 2 पथके मदतकार्यात गुंतली आहेत.
3 लाख 14 हजार नागरिकांना पुनर्वसन शिबिरांमध्ये हलवले
एनडीआरएफच्या पथकांनी गेल्या 24 तासांत 194 नागरिक आणि 12 जवानांची पुराच्या पाण्यातून सुरक्षित सुटका केली आहे. केरळमध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या महापुरातून आजवर 10,467 नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. त्यातील 159 नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुरामुळे राज्यात हाहाकार उडाला असून 3 लाख 14 हजार नागरिकांना पुनर्वसन शिबिरांमध्ये हलवण्यात आले आहे.
नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर नजर
2006 मध्ये एनडीआरएफच्या स्थापनेपासून आतापर्यंत सर्वाधिक जवान केरळमध्ये तैनात केले गेले आहेत. प्रत्येक पथकामध्ये 35-40 जवानांचा समावेश आहे अशी माहिती एनडीआरएफच्या प्रवक्त्याने दिली आहे. एनडीआरएफच्या नियंत्रण कक्षातून राज्यातील पूरग्रस्त भागातील परिस्थितीवर 24 तास बारीक नजर ठेवली जात आहे. मदतकार्यासाठी एनडीआरएफ इतरही यंत्रणांच्या सतत संपर्कात आहे.
पूरग्रस्तांसाठी पुण्यातून रेल्वेची ‘जलदूत’ रवाना
पुणे – केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीला पुणेकर धावले आहेत. केरळमध्ये अतिवृष्टी आणि महापुराचे संकट ओढवले असल्याने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पुरामुळे केरळमध्ये पिण्यायोग्य पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने केरळला सात लाख लिटर पाणी पाठविले आहे. पुणे विभागातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथून 14 वॅगनमध्ये सात लाख लिटर पाणी भरण्यात आले. दरम्यान, मध्य प्रदेश येथील रतलाम येथून 15 वॅगनच्या माध्यमातून साडेसात लाख लिटर पाणी पाठविण्यात आले आहे. घोरपडी येथे या दोन्ही ठिकाणच्या पाण्याचे वॅगन एकत्र जोडून 29 वॅगनची ‘जलदूत’ तब्बल साडेचौदा लाख लिटर पाणी घेऊन केरळकडे रवाना करण्यात आली.
12 जिल्हे उद्ध्वस्त; रेडऍलर्ट जारी केरळमधील 14 जिल्हय़ांपैकी 11 जिल्हय़ांमध्ये पूरस्थिती गंभीर असून राज्य सरकारने ‘रेडऍलर्ट’ जारी केला आहे. n सर्व नद्या तुडुंब वाहत असून 80 धरणांचे दरवाजे पूर्णपणे उघडले आहेत. n शंभर वर्षांतील सर्वांत मोठय़ा महापुराचा तडाखा केरळला बसला आहे. n गुरुवारी एकाच दिवशी 106 लोक मृत्युमुखी पडले. मृतांची संख्या 357 वर गेली आहे. n उद्ध्वस्त झालेल्या केरळच्या नुकसानीचा आकडा 19 हजार 512 कोटी रुपये असल्याची माहिती मुख्यमंत्री विजयन यांनी दिली.
पंतप्रधान मोदींनी केली 500 कोटींच्या मदतीची घोषणा
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पूरगस्त केरळची हवाई पाहणी केली. मुख्यमंत्री विजयन त्यांच्या बरोबर होते. पाहणीनंतर पंतप्रधानांनी थिरुवनंतपुरम येथे बैठक घेऊन पूरस्थितीचा आढावा घेतला.
– केरळला तातडीची मदत म्हणून केंद्र सरकारकडून 500 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री विजयन यांनी महापुरामुळे केरळचे नुकसान 19 हजार 512 कोटी रुपयांचे झाल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांना दिली.
– केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी 12 ऑगस्ट रोजी केरळचा हवाई दौरा करून 100 कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.
– पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.
महाराष्ट्रातील सरकारी अधिकाऱयांकडून एक दिवसाचे वेतन
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचा पगार देण्याची घोषणा महासंघाचे संस्थापक ग. दि. कुलथे यांनी केली. राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देतील. एक दिवसाच्या वेतनाच्या माध्यमातून सुमारे 25 ते 30 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य पूरग्रस्तांच्या मदतनिधीत जमा होईल, असे महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई म्हणाले.
काँग्रेस आमदारांचे एक दिवसाचे वेतन
महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे आमदार केरळमधील पूरग्रस्तांसाठी एक दिवसाचे वेतन देतील, अशी माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार एक दिवसाचे वेतन पक्षाकडे जमा करतील. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपले एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांना दिले आहे.
























































