
निसर्गाच्या प्रकोपाशी लढा देत गेले चार दिवस सुरू असलेली इर्शाळवाडीतील शोधमोहीम अखेर आज एनडीआरएफने थांबवली. गावकऱ्यांच्या विनंतीनंतर हे बचावकार्य थांबवण्यात आले असून काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या दरड दुर्घटनेत 57 गावकरी बेपत्ता घोषित करण्यात आले आहेत. याआधी बळींची संख्या 27 इतकी जाहीर करण्यात आली आहे. इर्शाळवाडी परिसरात पर्यटनाला सरकारने बंदी घातली असून बघ्यांची गर्दी लक्षात घेऊन 144 कलम लागू केले आहे. या आपत्तीतून बचावलेल्या ग्रामस्थांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरडग्रस्त भागाला कुंपण; 24 तास पोलीस बंदोबस्त
इर्शाळवाडीची लोकसंख्या 229 एवढी होती. आता या वाडीला स्मशानशांततेचे स्वरूप आले आहे. बचावकार्य संपल्यानंतर तातडीने दरडग्रस्त भागाला कुंपण घालण्यात येणार असून घटनास्थळी 24 तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. येथे पर्यटकांसह कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.


























































