
खालापूरच्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. पावसाच्या तुफान माऱ्याने महाकाय दरडी आणि चिखलमातीचा डोंगर वाडीवर कोसळून 25 हून अधिक घरे गाडली गेली. या दुर्घटनेत क्षणात होत्याचे नव्हते झाले. बुधवारी एनडीआरएफ जवांनानी बचावकार्य आणि शोधमोहिम सुरू केली होती. प्रतिकूल हवामानाचा समाना करत रविवारपर्यंत ही शोधमोहिम सुरू होती. रविवारी गावकऱ्यांच्या विनंतीनंतर एनडीआरएफने इर्शाळवाडीतील शोध मोहीम थांबवली आहे. गावातील बेपत्ता 57 गावकरी मृत घोषित करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या 84 झाली आहे.
बुधवारी या दुर्घटनेनंतर आक्रोश, किंकाळ्या आणि हंबरडय़ाने काळजाचा थरकाप उडाला. उंचावर असलेल्या आणि केवळ एकच पायवाट असलेल्या या आदिवासी वाडीवर मनुष्यबळ वगळता कोणतीही यंत्रणा पोहचू शकत नसल्याने एनडीआरएफ, टीडीआरएफकडून सुरू असलेल्या बचावकार्यात प्रचंड अडथळे निर्माण होत होते. खालापूर तालुक्यातील चौक गावापासून सहा किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरील पट्टय़ात इर्शाळगड ही आदिवासी वाडी होती. इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या या वाडीचे नाव इर्शाळगडावरूनच इर्शाळवाडी असे पडले होते. या वाडीत सर्व 48 घरे ही आदिवासी ठाकूर समाजाची असून 228 इतकी लोकसंख्या होती. मोलमजुरी आणि मासेमारी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते.
या घटनेनंतर इर्शाळवाडी परिसरात पर्यटन बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. या दुर्घटनेने इर्शाळवाडी नावाचे गाव नकाशावरून कायमचे पुसले गेले आहे. आता फक्त गावाच्या खुणा उरल्या आहेत.


























































