
आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपपूर्वी बांगलादेश आणि पाकिस्तान दौऱयासाठी न्यूझीलंडने दुय्यम दर्जाचा संघ निवडला. न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघात समावेश असलेले सात क्रिकेटपटू या दोन मालिकेत न खेळता आयपीएलमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याचा चांगलाच तीळपापड झाला असून त्याने याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवरच (आयसीसी) टीका केलीय.
न्यूझीलंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत पाकिस्तानचा मुख्य संघ खेळणार आहे. मात्र न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याच्यासह प्रमुख खेळाडू पाकिस्तान दौऱयावर न जाता आयपीएल खेळणार असल्याने इंझमाम-उल-हकने चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, या प्रकरणात ‘आयसीसी’ने गप्प बसायला नको होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा खासगी लीगला क्रिकेटपटू महत्त्व द्यायला लागले आहेत. पाकिस्तानचा क्रिकेट संघ कुठेही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला गेला, तरी आमच्यासमोर प्रतिस्पर्धी संघ हा दुय्यम दर्जाचाच असतो.
एप्रिलमध्ये आम्ही दक्षिण आफ्रिका दौऱयावर गेलो होतो, त्या वेळीही दक्षिण आफ्रिकेने आपल्या प्रमुख खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली होती. इंग्लंड दौऱयावरही आम्हाला त्यांच्या ‘ब’ संघाविरुद्धच खेळावे लागले. इंग्लंडला संघात कोरोनाचा शिरकाव झाला होता, म्हणून ते कारण आम्ही समजू शकतो. मात्र आम्हाला प्रतिस्पर्धी मुख्य संघासोबत खेळण्याची संधी मिळत नाही, याकडे आयसीसीने लक्ष द्यायला हवे, असेही इंझमाम- उल-हक म्हणाला.



























































