आत्मनिर्भर हिंदुस्थानकडे वाटचाल करताना नावीन्यतेचा ध्यास घेऊन उद्यमशिलतेला चालना देण्याची गरज आहे. तसेच काळानुसार किज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणाऱ्या बदलांप्रमाणे शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ सोमवारी ऑनलाईन पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून, नॅनो तंत्रज्ञान मागे पडून कृत्रिम बुद्धिमत्तेचे क्षेत्र पुढे आले आहे. जगासह देशात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने अनेक समाजोपयोगी संशोधन होत आहेत, याचा उत्तमोत्तम फायदा देशाला अग्रेसर होण्यासाठी नक्कीच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. देशातील एक अग्रगण्य किद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठ ओळखले जाते. मुंबई विद्यापीठाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महत्वाचे योगदान दिले आहे. विद्यापीठाने देशाला पाच भारतरत्न तसेच अनेक पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्ती दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.
चिनी बनावटीच्या झूम अॅपद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद
चिनी बनावटीच्या झूम मोबाईल अॅपवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे, असे असताना राज्यपालांनी चिनी बनावटीच्या झूम अॅपकरून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या ऑनलाईन सोहळय़ादरम्यान नाराजी व्यक्त केली.



























































