
हवामान बदल, कोविड आणि युक्रेनमधील युद्ध या समस्यांना तोंड देण्यास संयुक्त राष्ट्र संघ अपयशी ठरल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यूएनच नव्हे तर यात योग्य सुधारणा करण्यातही आपण सर्वच अपयशी ठरलो आहोत, असेही मोदी म्हणाले.
येथे 17 व्या जी 20 परिषदेला आज सुरुवात झाली. दोनदिवसीय शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदी यांनी अन्न व ऊर्जा सुरक्षा यावर मार्गदर्शन केले.
बायडेन, सुनक यांची भेट
या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, हिंदुस्थानी वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो क्रिशिदा यांचीही भेट घेतली.
संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे युव्रेनमध्ये युद्धविराम करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कोरोनानंतरच्या युगासाठी नवीन जागतिक व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. जगात शांतता, सौहार्द आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित आणि सामूहिक संकल्प दाखवणे ही काळाची गरज आहे. मला खात्री आहे की, पुढच्या वर्षी जेव्हा बुद्ध आणि गांधींच्या पवित्र भूमीवर जी-20 चे आयोजन होईल तेव्हा आपण सर्वजण जगाला शांततेचा मजबूत संदेश देऊ.
बाली येथे ‘जी-20’ परिषदेनिमित्त इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो यांनी सोमवारी रात्री सर्व सहभागी राष्ट्रप्रमुखांसाठी स्नेहभोजन आयोजन केले होते. या वेळी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनापिंग यांची भेट झाली. मात्र नेमका ‘संवाद’ काही झाला नाही.
हिंदुस्थानी वंशाच्या समुदायाला केले संबोधित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत समारंभात बालीमध्ये राहणाऱ्या सुमारे 800 हिंदुस्थानी वंशाच्या लोकांना संबोधित केले. 21 व्या शतकात हिंदुस्थानी आणि इंडोनेशिया विकासासाठी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. कटक, ओडिशा येथे दरवर्षी होणाऱ्या बाली जत्रेचा उल्लेख करून त्यांनी हिंदुस्थानी आणि इंडोनेशिया यांना जोडण्याचा प्रयत्न केला.



























































