आपल्या समोर असलेले हे संन्यासी म्हणजे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूच आहेत!

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री गुरुदेव दत्त ।।

“आपल्या समोर असलेले हे संन्यासी म्हणजे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूच आहेत श्रीमद्य शंकराचार्यांप्रमाणेच ते सुद्धा धर्मसंस्थापनेचे कार्य करीत आहेत त्यांनी वर्णाश्रमधर्माचे काटेकोर व अत्यंत कडकडीतपणे परिपालन करून लोकांसमोर अत्युच्च आदर्श निर्माण केला आहे!”

।। श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज ।।

तंजारहून निघून श्रीस्वामी महाराज सत्यमंगलच्या वाटेला लागले. वाटेत श्री. वासुदेवराव मराठे नावाच्या एका ब्राह्मण गृहस्थास औषधोपचार करून त्यांनी त्याला महामारीच्या रोगातून मुक्त केले. सत्यमंगल या गावी दोन दिवस मुक्काम होऊन, ते कावेरी नदीच्या तीरावरील श्रीरंगम् या ठिकाणी आले. त्या वेळी तेथे शृंगेरी मठाचे शंकराचार्य यांचा मुक्काम होता. त्यांचे नाव प.प. सच्चिदानंद शिवाभिनव भारती श्रीस्वामी महाराजांना पाहताच श्रीशंकराचार्यांनी उठून त्यांचे स्वागत केले व त्यांना आपल्या जवळ बसवून घेऊन ते म्हणाले; आपल्या दर्शनाची पुष्कळ दिवसांची इच्छा ईश्वराने आज पूर्ण केली!”

त्यानंतर श्रीस्वामी महाराजांनी जगद्गरु श्रीशंकराचार्य व शारदा मातेची स्तोत्र रचून स्तुती केली. ती ऐकून आचार्य संतुष्ट झाले. त्यांनीही श्रीमहाराजांच्या वर्णनपर एक स्तोत्र करून त्यांना ऐकविले. त्यानंतर श्रीस्वामी महाराजांसंबंधी सर्व लोकांना उद्देशून श्रीशंकराचार्य म्हणाले; “आपल्या समोर असलेले हे संन्यासी म्हणजे प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूच आहेत. श्रीमदाद्य शंकराचार्यांप्रमाणेच ते सुद्धा धर्मसंस्थापनेचे कार्य करीत आहेत. त्यांनी वर्णाश्रमधर्माचे काटेकोर व अत्यंत कडकडीतपणे परिपालन करून लोकांसमोर अत्युच्च आदर्श निमार्ण केला आहे!”

त्याला उत्तरादाखल केलेल्या भाषणांत श्रीस्वामी महाराज म्हणाले; “आचार्यांच्या या गादीवर आपण योग्य अधिकारी पुरुष असून, आपल्यामुळे या गादीला शोभा आली आहे. आपले सर्व संकल्प ईश्वर पूर्ण करील!” त्यानंतर श्रीशंकराचार्यांनी श्रीस्वामी महाराजांकडे त्यांनी रचलेले काही ग्रंथ असल्यास आपणांस ते द्यावेत अशी मागणी केली. परंतु त्या वेळी स्वरचित एकही ग्रंथ त्यांच्या जवळ नसल्यामुळे त्यांनी मंत्रगर्भस्तोत्र तेवढे लिहून दिले व स्वरचित ग्रंथ पाठविण्याचे आश्वासन दिले. ते स्तोत्र वाचून आचार्यांना फार संतोष झाला.

श्रीशंकराचार्य हे श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना त्यांच्या जन्मगावी ‘कालडी’ येथे करण्यासाठी निघणार होते, म्हणून त्यांची परवानगी घेऊन श्रीस्वामी महाराज कावेरी नदीतीरावरील सत्यमंगल या गावी आश्विन अमावास्येला पोहोचले. तेथे आल्यावर श्रीदत्तप्रभूंनी स्वामी महाराजांना सांगितले की, “पुढील प्रदेशात प्लेगची साथ असल्यामुळे पुढे न जाता येथेच संचार करावा!” त्यामुळे त्यांनी भवानी व कावेरी या नद्यांच्या संगमावरील भवानी या गावी कार्तिक शुद्ध 11 रोजी येऊन तेथे पंधरा-वीस दिवस मुक्काम केला.

तेथे असताना, गुंटूर जिल्ह्यातील अमरावती या गावचे श्री. लक्ष्मणशास्त्री आपल्या या व मुलीला घेऊन श्रीमहाराजांच्या दर्शनाला आले त्यांच्या दोन्ही मुलांच्या नाकात व्रण झाल्यामुळे त्यांना फार त्रास होत होता. औषधाने त्यांना गुण येईना, म्हणून ते श्रीस्वामी महाराजांना काही विचारण्यासाठी आले होते. श्रीमहाराजांना त्यांनी तशी प्रार्थना केली. श्रीस्वामी महाराजांनी वाकेरीचे भाते देऊन उगाळून त्याचा लेप सांगितले. पुढे मार्गशीर्ष महिन्यात श्रीस्वामी महाराज अमरावतीला घरी गेले त्या वेळी त्यांनी दोन्ही मुलांच्या नाकातील व्रण तपासून पारि बहुतांशी बरे झाले होते. पण पुन्हा त्यांनी त्यांना वाकेरीचे भाते आणून दिले व त्या औषधाने काही दिवसांनी ते व्रण पूर्ण बरे झाले.

आपली प्रतिक्रिया द्या