
विधान परिषदेच्या उपसभापती, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मातोश्री लतिका दिवाकर गोऱ्हे (87) यांचे आज निधन झाले. लतिका यांच्या पश्चात डॉ. नीलम गोऱ्हे आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त झेलम जोशी या दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
लतिका गोऱहे यांचा जन्म 2 ऑगस्ट 1935 रोजी पंढरपूर येथे देशपांडे कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीपाद देशपांडे आणि आई अनुसया देशपांडे यांच्या सुसंस्कृत आणि मोठय़ा कुटुंबात त्यांचे संस्कारपूर्ण शिक्षण झाले. त्यांचा विवाह प्रख्यात संशोधक क पशुवैद्यकीय तज्ञ डॉ. दिवाकर गोऱहे यांच्याशी झाला. विवाहानंतर लतिका गोऱहे यांनी बी.ए.चे शिक्षण पूर्ण केले. विवाहानंतर त्यांचे वास्तव्य काही काळ बडोदा, मुंबई आणि त्यानंतर पुणे येथे 42 वर्षे होते. साहित्याची त्यांना विशेष आवड होती. विवीध संस्थांवर त्यांनी कार्य केले आहे. काही संस्थांमध्ये उपाध्यक्षव पदाधिकारी म्हणून तीन दशके त्यांनी काम पाहिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मिलिंद नार्वेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मोहन जोशी, अरविंद शिंदे, आमदार संग्राम थोपटे, कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांनी मॉडेल कॉलनीतील निवासस्थानी जाऊन लतिका गोऱहे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.





























































