NEET 2026 Paper Leak Row: जयपूरमधून मुख्य सूत्रधाराला अटक, देशभरात पसरले धागेदोरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

NEET-UG २०२६ परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणांनी जयपूरमधून मनीष यादव नावाच्या मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. या कारवाईमुळे एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, याचे धागेदोरे देशभरात पसरले असल्याचे समोर आले आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये काही कोचिंग सेंटर्स, मध्यस्थ आणि तांत्रिक तज्ज्ञांचा समावेश आहे, असे बोलले जात आहे. राजस्थानमधील एका पीजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून पेपर बाहेर काढण्यात आल्याचा संशय आहे. गेस पेपरच्या नावाखाली काही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळणारे प्रश्न आधीच देण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, परीक्षेतील १०० पेक्षा जास्त प्रश्न या लीक झालेल्या माहितीशी मिळतेजुळते आढळले आहेत, अशीही माहिती समोर आली आहे.

राजस्थानची एसओजी, केंद्रीय तपास यंत्रणा आणि इतर राज्यांचे पोलीस या प्रकरणाचा संयुक्त तपास करत आहेत. जयपूरच्या मनीषने प्रश्नपत्रिका तयार होण्यापूर्वीच संभाव्य प्रश्नांची माहिती मिळवल्याचा आरोप आहे. आतापर्यंत या प्रकरणात अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, या पेपर लीकच्या वृत्तामुळे देशभरातील वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. परीक्षेच्या कडक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, अनेक विद्यार्थी आणि पालकांनी Re-NEET म्हणजेच फेरपरीक्षा घेण्याची मागणी लावून धरली आहे.