हिंदुस्थान संघर्षासह उपांत्य फेरीत; नेपाळने हिंदुस्थानला झुंजवले

थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या हिंदुस्थानचा उपांत्य फेरीत पोहोचताना नेपाळसारख्या नवख्या संघाने अक्षरशः घामटा काढला. यशस्वी जैसवालचे 49 चेंडूंतील शतक आणि रिंकू सिंहच्या 15 चेंडूंतील 37 धावांच्या घणाघातामुळे हिंदुस्थानने 4 बाद 202 अशी मजल मारली. नेपाळने या धावांचा जोरदार पाठलाग केला, पण त्यांचा अनुभव थोडक्यात कमी पडल्यामुळे ते 20 षटकांत 9 बाद 179 धावांपर्यंतच पोहोचू शकले आणि हिंदुस्थानने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या क्रिकेट प्रकाराची उपांत्य फेरीत गाठली.

आज एकटय़ा यशस्वी जैसवालने 7 षटकार आणि 8 चौकारांची बरसात करत नेपाळची गोलंदाजी अक्षरशः पह्डून काढली. त्याने ऋतुराज गायकवाडसह 103 धावांची आक्रमक सलामीही दिली. पण ही जोडी फुटल्यानंतर तिलक वर्मा (2) आणि जितेश शर्मा (5) हे झटपट बाद झाले. यशस्वीचा झंझावात शतकानंतरच 17 व्या षटकांत थांबला. तेव्हा हिंदुस्थानच्या 150 धावा झाल्या होत्या, मात्र शिल्लक 22 चेंडूंत रिंकू सिंहच्या फटकेबाजीमुळे हिंदुस्थान द्विशतकापार पोहोचला. रिंकूने शिवम दुबेच्या साथीने 52 धावांची भागी रचली.

नेपाळच्या फलंदाजांचा संघर्ष : हिंदुस्थानच्या 203 धावांचा पाठलाग करताना नेपाळचा एकही फलंदाज तिशीच्या पुढे गेला नाही, पण त्यांचा सर्वच फलंदाजांनी खारीचा वाटा उचलत शेवटपर्यंत विजयासाठी प्रयत्न केले. त्यामुळे नेपाळ विजयापासून फार दूर नव्हता. त्यांची धावगती हिंदुस्थानच्याच बरोबरीने जात होती. शेवटच्या चार षटकांत त्यांना 56 धावांची गरज होती, पण ते या धावा करण्यात थोडक्यात कमी पडले.

…तर निकाल वेगळा असता : हिंदुस्थानने रिंकूमुळे शेवटच्या दोन षटकांत 39 धावा केल्या. जर रिंकू अपयशी ठरला असता तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता. रिंकूने पहिल्या 7 चेंडूंत 7 धावा केल्या होत्या तर पुढच्या 8 चेंडूंत 30 धावा ठोकल्यामुळे हिंदुस्थानने शेवटच्या दोन षटकांत 39 धावा चोपल्या. याच धावा निर्णायक ठरल्या.