नेपाळचा सीमेवर प्रचंड राडा, हिंदुस्थानचे रस्त्याचे काम रोखले; 20 मीटर जागेवरही दावा

7185

नेपाळने बिहारमधील सीतामढी सीमेवर प्रचंड राडा करून हिंदुस्थान करत असलेले रस्त्याचे बांधकाम रोखले. एवढेच नाही, तर नेपाळने 20 मीटर जागेवर आपला दावाही केला आहे. यापूर्वी मानसरोवर रस्त्याच्या कामाला आक्षेप घेत नेपाळने लिंपुधारा, कालापानी हा भूभाग आपल्या कब्जात दाखविला होता.

चीनच्या जोरावर मानसरोवर यात्रेच्या मार्गावरील हिंदुस्थान करीत असलेले रस्त्याचे काम नेपाळने प्रचंड थयथयाट करून बंद पाडले. लिंपुधारा, कालापानी हा भूभाग नव्या राजकीय नकाशात दाखवून त्याला संसदेची मंजुरीही घेतली. आताही बिहारमधील सीतामढी सीमेवर नेपाळी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी हिंदुस्थानात घुसखोरी केली. रस्त्याचे काम बंद करण्यास भाग पाडले. भिठ्ठामोड ते नो मॅन्स लॅण्डला जोडणारा हा रस्ता असून, या जागेवर नेपाळने दावा सांगितला आहे. दरम्यान, सीतामढीचे पोलीस अधीक्षक अनिल कुमार, तसेच भिठ्ठाचे प्रभारी राजेश कुमार या वरिष्ठ अधिकाऱयांनी अतिशय संयमाने परिस्थिती हाताळत नेपाळी सैनिकांना माघारी पाठविले.

कम्युनिस्ट पक्षाची बैठक अचानक रद्द
– देशात निर्माण झालेल्या राजकीय पेचावर तोडगा काढण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाची बैठक आज बोलावण्यात आली होती. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी ही बैठक रद्द करण्यात आली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले, तर पुष्पकमल दहल प्रचंड हे राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत. आपल्याला हटविण्यात आले तर पक्षात फूट पडेल, अशी धमकी ओली यांनी दिल्यामुळे बैठक रद्द झाली.

चिनी राजदूताच्या विरोधात संताप
– चीनच्या नेपाळमधील राजदूत होऊ यानकी यांनी पंतप्रधान ओली यांचे सरकार काचविण्यासाठी थेट राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली. एवढेच नाही, तर सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक नेत्यांना त्या भेटल्या. यानकी यांच्या या उचापतींमुळे चीन नेपाळच्या राजकारणात नाक खुपसत असल्याचा संदेश जनतेमध्ये गेला. यामुळे संतप्त जनतेने रस्त्यावर उतरून चीनला नेपाळच्या अंतर्गत राजकारणात नाक न खुपसण्याचा इशारा दिला

आपली प्रतिक्रिया द्या