नेपाळच्या ‘या’ क्रिकेटपटूने मोडला सचिनचा विक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम नेपाळच्या रोहित पाउडेलने मोडला आहे. रोहितचे वय 16 वर्ष 146 दिवस इतके आहे. रोहितने संयुक्त अरब अमिरात (यूएई) विरुद्ध खेळताना 55 धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने सचिनचा 29 वर्षापूर्वीचा विक्रम मोडला असून आता तो सर्वाधिक कमी वयाचा अर्धशतकवीर ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावल्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. 16 वर्ष 213 दिवसांचा असताना सचिनने 23 नोव्हेंबर 1989 रोजी फैसलाबादमध्ये पाकिस्तानविरुद्ध 59 धावा केल्या होत्या. नेपाळच्या रोहितने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचाही विक्रम मोडला आहे. आफ्रिदीने 23 वर्षापूर्वी 16 वर्ष 217 दिवसांचा असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 धावा केल्या होत्या. सातव्या स्थानावर खेळण्यासाठी उतरलेल्या रोहितने 58 चेंडूत 55 धावा केल्या. यावेळी त्याने 7 चौकार ठोकले. रोहितच्या या खेळीमुळे नेपाळने 50 षटकात 9 गडी बाद 242 धावा केल्या.

नेपाळने दिलेले आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या यूएईचा संघ 97 धावांवर बाद झाला. नेपाळने हा सामना 145 धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघाने 1-1 बरोबरी साधली आहे.