‘या’ देशात 55 वर्षांपुढील व्यक्तींची इच्छामृत्यूची मागणी…वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जीवनात अशा काही अडचणी येतात की मनुष्य हतबल होतो. त्याच्यासमोर कोणताही मार्ग दिसत नाही. नैराश्याने खचलेली अशी माणसे जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, एकाचवेळी, एकाच वयोगटातील माणसांना जीवन संपवण्याची इच्छा होत असेल तर…अशीच घटना सध्या नेदरलँडमध्ये घडत आहेत. या देशातील वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्ती आपले आयुष्य संपवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी त्यांनी सरकारकडे इच्छामृत्यूची मागणी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात इच्छामृत्यूची मागणी का होत आहे, असा यक्षप्रश्न नेदरलँड सरकारला पडला आहे. तसेच याबाबत ही समस्या सोडवण्यासाठी विचारविनिमय सुरू असून काय उपाययोजना कराव्यात, याचा आढावा घेण्यात येत आहे.

नेदरलँडमधील वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींनी सरकारकडे इच्छामृत्यूची मागणी केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी संसदेत सांगितले. त्यामुळे खळबळ उडाली आहे. देशातील 55 वर्षांवरील 0.18 टक्के नागरिकांनी इच्छामृत्यूची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. या अहवालात त्यांनी देशातील या वयोगटातील नागरिक इच्छामृत्यूची मागणी का करत आहेत, त्याचेही कारण दिले आहे. इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्यांना असाध्य व्याधींनी आणि अंथरुणाला खिळून मरण्याची इच्छा नाही. चालतेफिरते असताना सुसह्य परिस्थितीत मृत्यू यावा, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे या वयोगटातील लोकांच्या मनात असाध्य व्याधींची भीती आहे, त्यामुळे अशी मागणी होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. इच्छामृत्यूची मागणी करणाऱ्यांची संख्या 10,156 आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या मागणीमुळे सरकार,देश आणि समाजावर विपरीत परिणाम होणार आहेत, त्यामुळे सामाजिक मुद्दा म्हणून याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याची मागणी आरोग्यमंत्र्यांनी केली आहे. लोकांच्या मनात एखादी भीती असेल तर ती दूर करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. निराश झालेल्या व्यक्तींना जीवनाचा खरा अर्थ समजावत त्यांनी जगण्यासाठी प्रेरीत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

नेदरलँडमध्ये या मुद्दावरून राजकीय चर्चा सुरू आहेत. 75 वर्षांवरील व्यक्तींना असाध्य व्याधी असल्यास त्यांच्यासाठी इच्छामृत्यूबाबतचे विधेयक आणण्याची मागणी एका पक्षाने केली आहे. अशा व्यक्तींना सन्मानाने आणि सुसह्यपणे मृत्यू यावा, अशी इच्छा आहे, त्यांच्या या इच्छेचा सन्मान करण्यासाठी या विधेयकाची गरज असल्याचे ते म्हणाले. नेदरलँडमध्ये 2001 मध्ये मोठ्या संख्येने इच्छामृत्यूची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर नेदरलँडमध्ये इच्छामृत्यूवर बंदी घालण्यात आली होती. अशाप्रकारे निर्णय घेणारा हा पहिलाच देश आहे. 55 वर्षांवरील व्यक्तींनी केलेल्या इच्छामृत्यूच्या मागणीबाबत निर्णय घेण्यासाठी याचे संशोधन आणि सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया धक्कादायक आणि गंभीर असल्याने ही समस्या गांभीर्याने सोडवण्याची गरज आहे.

याआधी एका ज्येष्ठ महिलेला 68 वर्षांच्या निवृत्त डॉक्टरने कॉफीमध्ये झोपेच्या गोळ्या देत तिला इच्छामृत्यू दिला होता. तसेच बेल्जियममध्ये तीन डॉक्टरांनी गंभीर मानसीक रुग्ण असलेल्यांना इच्छामृत्यू दिला होता. त्यांचे हे कृत्य बेकायदा आहे, असे सांगण्यात आले. मात्र, बेल्जियममध्ये 2002 मध्ये इच्छामृत्यूचा कायदा करण्यात आला आहे. त्यात दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करत इच्छामृत्यू देण्याची तरतूद आहे. इच्छामृत्यूसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. इच्छामृत्यूची मागणी करणारी व्यक्ती असाध्य व्याधींशी मुकाबला करत आहे, त्या व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची कोणतीही शक्यता नाही. तसेच त्या व्याधींमुळे ती व्यक्ती असह्य वेदना सहन करत आहे. त्यामुळे इच्छामृत्यूशिवाय त्या व्यक्तीसमोर इतर कोणेतही पर्याय नाहीत, अशा व्यक्तींच्या इच्छामृत्यूच्या मागणीबाबत सरकार निर्देश देऊ शकते. तसेच याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा करून पुढील प्रक्रिया करण्यात येते. मात्र, सध्या नेदरलँडमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी इच्छामृत्यूची मागणी सामाजिक समस्या बनली आहे.