आपल्या चुकांची शिक्षा  मुलांना नको! पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे मत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वच्छता मोहिमेत आज आपण मुलांना समुद्रकिनारे साफ करायला लावत आहोत. आपल्या पिढीने प्लॅस्टिक वापरले, मात्र कचरा व्यवस्थापन केले नाही. समुद्रकिनारे, नदीनाले, हवा प्रदूषित केली आणि याचे परिणाम आपली पुढची पिढी भोगत आहे. यामुळे एक प्रकारे आपण आपल्या चुकांची शिक्षा मुलांना देत आहोत, असे मत राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ट्रेड टॉवर येथे पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने (पीआयसी) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पीआयसीचे अध्यक्ष विख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष व पीआयसीचे विश्वस्त प्रा. अमिताव मलिक, पीएमआरडीए आयुक्त विक्रम कुमार ‘क्लायमेट कलेक्टिव्ह’चे डॉ. नितांत माटे, डॉ. प्रियदर्शनी कर्वे, प्रा.डॉ. गुरुदास नुलकर, प्रा. अनिता गोखले बेनिंगर, सारंग यादवाडकर, अनुपम सराफ आदी उपस्थित होते. या वेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पीआयसीच्या ‘मेकिंग पीएमआर कार्बन न्यूट्रल बाय-2030’ या धोरण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

आदित्य ठाकरे म्हणाले, पर्यावरण संवर्धन काळाजी गरज आहे. आज राजकारणी लोक वायफाय हॉटस्पॉट देण्याचे आश्वासन देतात. मात्र पुढे ‘ऑक्सिजन हॉटस्पॉट’ देऊ असे सांगण्याची वेळ येऊ नये. यामुळे पर्यावरण खात्याच्या माध्यमातून भरीव काम करण्याची गरज आहे. शहराचे नियोजन करताना वाहतूक नियोजन, घनकचरा विघटन व व्यवस्थापन,  जंगल वाढवणे व सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यार भर देण्यात येणार आहे.

पुण्यातून कार्बन न्यूट्रलचा पॅटर्न

जगभरात आज ‘कार्बन न्यूट्रल’ शहरांचा ट्रेंड आहे. आज भूतानने याकडे पावले उचलली आहेत. पुणेही लवकरच या दिशेने पावले उचलेल, असा माझा विश्वास आहे. पुण्यातून ‘कार्बन न्यूट्रल’ शहरांचा पॅटर्न आता सुरू होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.