नेवासा पंचायत समितीवर शंकरराव गडाख यांचे वर्चस्व

585

नेवासा पंचायत समितीच्या सभापतीपदी नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथील पंचायत समितीचे सदस्य रावसाहेब सोन्याबापू कांगुणे यांची तर उपसभापतीपदी भानसहिवरा येथील पंचायत समितीचे सदस्य किशोर आसाराम जोजार यांची बिनविरोध निवड झाली. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे नेवासा पंचायत समितीवर वर्चस्व असल्याचे दिसून आले.

नेवासा पंचायत समितीमध्ये शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली 14 पैकी 12 सदस्य निवडून आले आहेत. मंगळवारी सभापती व उपसभापतीपदासाठी निवड होण्याअगोदर सर्व 12 सदस्यांची जेष्ठ नेते विश्वासराव गडाख, बाजार समितीचे सदस्य कडूबाळ कर्डीले,जिल्हा परिषद सदस्य युवा नेते सुनीलभाऊ गडाख, मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, उपाध्यक्ष भाऊसाहेब मोटे, सभापती कल्पना पंडित, उपसभापती राजनंदिनी मंडलिक यांच्यासोबत सर्व पंचायत समितीच्या सदस्यांची नेवासा येथे बैठक घेण्यात आली. नेवासा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वानुमते विचार करून सभापतीपदी मक्तापुर येथील पंचायत समितीचे सदस्य रावसाहेब कांगुणे यांची तर उपसभापतीपदासाठी भानसहिवरा येथील पंचायत समितीचे सदस्य किशोर जोजार यांच्या नावाची सूचना सभापती कल्पना पंडित व उपसभापती राजनंदिनी मंडलिक यांनी मांडली. त्यावर सर्वांनी एकमुखाने एकमताने निर्णय घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या दोघांची सभापती व उपसभापती म्हणून निवड जाहीर केली.

या निवड प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी काम पाहिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवड घोषित केल्यानंतर सभापती रावसाहेब कांगुणे व उपसभापती किशोर जोजार यांचा जेष्ठ नेते विश्वासराव गडाख व मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर भाऊसाहेब वाघ यांनी सत्कार केला. नेवासा पंचायत समितीच्या माध्यमातून शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व सुनिताताई गडाख यांच्या सूचनेनुसार काम करू, अशी ग्वाही सभापती रावसाहेब कांगुणे व उपसभापती किशोर जोजार यांनी दिली. सभापती रावसाहेब कांगुणे व उपसभापती किशोर जोजार यांचे पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या