परभणी जिल्ह्यात 14 नवीन रुग्णांची भर, एकूण संख्या 36 वर

429

जिंतूर तालुक्यातील सावंगी(भांबळे) येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असताना रविवारी दि 24 रोजी रात्री कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने 14 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यात गंगाखेड मध्ये 11 रुग्ण, परभणीतील नानलपेठ भागात 1 रुग्ण, सेलू ग्रामीण मध्ये 1 रुग्ण तर माळसोंना मध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह निघाला आहे. शुक्रवारी सकाळपासून शासकीय अधिकारी नांदेड येथील प्रयोगशाळेतून कधी अहवाल प्राप्त होतो या प्रतीक्षेत सर्व होते. रविवारी दिवसभर हा अहवाल प्राप्त झाला नाही.

रविवारी प्रलंबित स्वॅबची संख्या दोनशेवर पोहोचली. या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. शुक्रवारी मध्यरात्री नांदेड येथील प्रयोगशाळेतील प्राप्त अहवालानुसार सावंगी (भांबळे) येथील एक महिला व परभणीतील एक तरुणीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा रुग्ण संख्या 22 वर पोहोचली होती. त्याच त्या महिलेचा मृत्यू झाला होता. अन मध्यरात्री ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली होती तर जिल्ह्यात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. विशेष म्हणजे कोरोना बाधित सर्व रुग्ण हे परजिल्ह्यातून आपल्या मूळ गावी म्हणजे परभणी जिल्ह्यात दाखल झालेले आहेत. त्यामुळेच परजिल्ह्यातील व्यक्तींसह कुटुंबियांच्या अधिकृतपणे-अनधिकृतपणे प्रवेशामुळे या जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे वातावरण चिंतेचे झाले आहे. त्यातच रविवारी पुन्हा नवीन 14 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्याचे टेन्शन वाढले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या