
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (यूआयडीएआय) ने एक नवीन अॅप लाँच केले आहे, अशी माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देण्यात आली आहे. या नव्या अॅपमुळे आता युजर्सला घरबसल्या आधारमधील नाव, पत्ता आणि जन्मतारीख यासारखी माहिती बदलण्याची परवानगी मिळणार आहे. यामुळे आता आधारकार्ड नेहमी तुमच्या फोनसोबत ठेवण्याची परवानगीसुद्धा मिळणार आहे. या अॅपचा सर्वात मोठा फायदा म्हणजे फेस स्कॅन करूनसुद्धा आयडी सुरक्षित शेअर करता येईल. हे नवीन अॅप अधिक सुरक्षित आणि युजर्ससाठी अनुकूल आहे, असे यूआयडीएआयने सांगितले. नव्या अॅपमुळे आता जुने एमआधार अॅप बंद केले जाणार आहे. या अॅपला अद्याप नाव देणे बाकी आहे, परंतु ते डिजिटल इंडियाला बळकटी देण्यासाठी आणले आहे. या अॅपद्वारे तुम्ही आता तुमचे आधारकार्ड तुमच्या फोनवर डाऊनलोड करू शकता. शेअरिंगमध्ये फेस ऑथेंटिकेशन वापरले जाईल, जे बायोमेट्रिक सुरक्षा प्रदान करते.
नव्या अॅपची वैशिष्टय़े
फोनमध्ये आधार ठेवाता येईल. ई-आधार नेहमीच तुमच्यासोबत असेल, कागदी प्रतीची गरज राहणार नाही.
आयडी शेअर करण्यासाठी फेस स्कॅन आवश्यक आहे, पिन-ओटीपीइतकेच सुरक्षित.
सुरक्षित लॉगिनः हे अॅप बायोमेट्रिक प्रमाणीकरणासह उघडेल.
सोपे अपडेट्सः नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा.
हे अॅप मराठीसह हिंदी, इंग्रजी आणि अन्य काही भाषांमध्ये उपलब्ध आहे.
ऑफलाइन वापरः तुमच्याकडे इंटरनेट नसले तरीही तुम्ही आधार पाहू शकता.
जुने एमआधार अॅप आता बंद केले जात आहे. आधार डेटा लीक झाल्याच्या तक्रारी यापूर्वीही आल्या आहेत. आता फेस स्कॅनद्वारे शेअरिंग केले जाईल, ज्यामुळे अनधिकृत प्रवेश कठीण होईल. या अॅपमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची सुविधा आहे, अशी माहिती यूआयडीएआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. 2009 मध्ये आधारकार्ड सुरू करण्यात आले होते. सध्या 1.3 अब्जहून अधिक लोकांकडे आधारकार्ड उपलब्ध आहे.
कसे डाऊनलोड कराल
हे नवीन अॅप प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअरवर ‘आधार न्यू अॅप’ ऑफिशियल शोधा.
आधार क्रमांक आणि ओटीपी वापरून नोंदणी करा.
फेस स्कॅन सेट करा.
आधार डाऊनलोड करा आणि शेअर करा.

























































