
सामना प्रतिनिधी । मुंबई
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी पुलावरील पादचारी मार्गिकेचा भाग कोसळल्यानंतर दोन महिने होत आले असून यापैकी पहिल्या पादचारी मार्गिकेचे काम येत्या चार ते पाच दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. पालिकेकडून यासाठीचा तीन कोटींचा निधी अद्याप मिळाला नसून तरीही रेल्वेने सुरुवातीस आपल्या तिजोरीतून हे काम वेगाने करण्याचे ठरविले आहे. पुलाच्या दक्षिणेकडील पादचारी मार्गही बांधण्याचे नियोजन आहे.
गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर उड्डाणपुलावरील वाहतूकही बंद करण्यात आली होती. मात्र दुसऱया बाजूच्या पादचारी मार्गिकेचे डिझाईनदेखील कँटीलिव्हर पद्धतीचे असल्याने तीदेखील पाडून नव्याने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्यासाठी गर्डरची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी साधारण तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार आहे. हा उड्डाणपूल महापालिकेचा असल्याने त्यासाठी निधी हा पालिकेकडून मिळणे अपेक्षित आहे. निधी त्वरित उपलब्ध केल्यास पादचारी मार्गिकांच्या कामाला सुरुवात केली जाईल.



























































